पुणे: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्यावर मला उत्तर द्यायचे नसल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (दि. 9) पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील तसेच मंगळवारी (दि. 10) होणार्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनावेळी मी या निवडणुकांबाबत पक्षाची भूमिका मांडेन, असेही ते म्हणाले.
ठाकरे बंधूंमध्ये एकत्र येण्याबद्दल काही सकारात्मक बातम्या आल्या आहेत. मात्र, उद्धव आणि राज ठाकरे हे दोघे याबाबत ठरवतील व जाहीर करतील. पक्षाचे समर्थक, पाठीराखे, हितचिंतक असतील ते कार्यकर्ते काही बोलून दाखवतात. (Latest Pune News)
यासंदर्भातही ठाकरे बंधूंच्या विषयानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर प्रसारमाध्यमांनीच हे सुरू केल्याचे नमूद करून त्यांनी एकत्र येण्याबद्दलचा प्रश्न खोडून काढला. तसेच, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनामध्ये मी पक्षाची भूमिका मांडेन, असे त्यांनी सांगितले.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनिमित्त मांजरीत आले असता ते पत्रकारांशी सोमवारी (दि. 9) दुपारी बोलत होते. दोन्ही राष्ट्रवादीची स्थापना 26 वर्षांपूर्वी झाल्याचा दावा केल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, 26 वर्षांचा दावा दोन्ही राष्ट्रवादीचा आहे.
ज्या त्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते हे आपापल्या पक्षासाठी काम आपल्या परीने करतात. चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकीची तयारीही प्रत्येकाने सुरू केली आहे. एखाद्या पक्षाची व्यक्ती ही आम्ही आमचे आजमावून घेणार आहोत, असे कोणीतरी बोलते. महायुतीमधील प्रत्येक पक्षाचे वरिष्ठ नेते हे याबाबत नेते निर्णय घेतील. ज्या वेळी कोणाचे काही ठरेल, त्यानुसार आम्ही सांगू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील रेल्वे दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पवार
सोमवारी मुंबईत घडलेल्या रेल्वे दुर्घटनेत सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या दुर्घटनेची जबाबदारी रेल्वे विभागाची असून, त्यांनी याबद्दलच्या चौकशीचे आदेश दिले असतील. चौकशीनंतर खरी वस्तुस्थिती समोर येईल. ज्या गोष्टी समोर येतील, त्याबद्दलची खबरदारी घेण्याच्या सक्त सूचना संबंधितांना देण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
या दुर्घटनेविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रेल्वेमंत्र्यांशी बोलले असतील. यामध्ये तातडीने नक्की काय उपाययोजना केल्यानंतर आपल्या मुंबईकरांचा किंवा लोकलमधून प्रवास करणार्या नागरिकांचा जीव सुरक्षित राहील, अशी पावले निश्चितपणे उचलली जातील. लोकलला दरवाजे केले तर ते कितपत मान्य होईल, हे पाहावे लागेल. अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर रेल्वे मंत्रालय हे मृतांच्या नातेवाइकांना मदत करतात. आरोग्याचा खर्च केला जातो, असेही ते म्हणाले.