जेजुरी; पुढारी वृत्तसेवा : बर्जर कंपनीत झालेल्या अपघातात तरुण कामगाराचा मृत्यू झाला, ही दुर्दैवी बाब आहे. या कुटुंबीयांना कंपनीने त्वरित आर्थिक मदत द्यावी. घरातील व्यक्तीला काम द्यावे आणि महत्त्वाचे म्हणजे कामगारांच्या सुरक्षिततेकडे कंपनीने लक्ष द्यावे. यापुढे कंपनीत एक ही अपघात झाला, तर मी स्वतः येऊन कंपनी बंद करेन, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.
सुळे यांनी बुधवारी (दि. 4) जेजुरी येथील बर्जर कंपनीत झालेल्या अपघातातील मृत रोहित माने यांच्या कुटुंबीयांची राख गावी जाऊन भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर बर्जर कंपनीसमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला भेट देऊन कामगारांशी तसेच कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा केली. या वेळी खासदार सुळे म्हणाल्या की, या ठिकाणी आम्ही राजकीय भूमिका घेणार नाही.
माणुसकीच्या नात्याने मृत कामगाराच्या कुटुंबीयांना मदत मिळावी, कामगारांना न्याय मिळावा, यासाठी आलो आहोत. कामगारांना सन्मानाने वागवा, त्यांना कंपनीत सुरक्षिततेची चांगली साधने उपलब्ध करून द्या, कामगारांना कायमस्वरूपी नोकरी दिली पाहिजे, लवकरात लवकर आर्थिक मदत करून कामगारांना न्याय द्या.
या वेळी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, उपाध्यक्ष संदीप चिकने, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, कात्रज दूध संघाचे संचालक तानाजी जगताप, बापूसाहेब भोर, माजी नगरसेवक मेहबूब पानसरे, काँग्रेसचे गणेश जगताप, ईश्वर दरेकर, कंपनीचे मॅनेजर राहुल नालगुने, ललित घोडके व मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.