मी मुख्यमंत्री होणार ही केवळ अफवा: मुरलीधर मोहोळ Pudhari
पुणे

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळ मुख्यमंत्री होणार? स्वतः खुलासा करत म्हणाले...

राज्यात महायुतीला दणदणीत बहुमत मिळाले असले, तरी मुख्यमंत्री कोण हे अधिकृतरीत्या जाहीर झालेले नाही.

पुढारी वृत्तसेवा

Pune Politics: राज्यात महायुतीला दणदणीत बहुमत मिळाले असले, तरी मुख्यमंत्री कोण हे अधिकृतरीत्या जाहीर झालेले नाही. त्यातच पुण्याचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांचे नावही मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत आले आहे. सोशल मीडियावर त्यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली असून, मोहोळ यांनी मात्र या चर्चेत कुठलेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरविण्यासाठी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची गुरुवारी रात्री बैठक झाली. त्यात फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, शुक्रवारी दिवसभरात मुख्यमंत्री कोण होणार, याची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहेत.

त्यात मुंबईसह पुण्याच्या राजकीय आणि मीडियाच्या वर्तुळात मुख्यमंत्री पदासाठी केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या नावाची गेल्या दोन दिवसांपासून चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर यासंबंधीचे मेसेज फिरत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात भाजप पुन्हा धक्कातंत्र देणार का, याबाबत जोरदार चर्चा आहे.

मोहोळ हे केंद्रात अमित शहा यांच्या समवेत सहकार राज्यमंत्री म्हणून काम करत आहेत. त्यातच गेली दोन वर्षे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. त्यामुळे मराठा चेहरा म्हणून मोहोळ यांचे नाव पुढे आणले जात आहे, अशी चर्चा आहे. दरम्यान, दै. ‘पुढारी’ने मोहोळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र स्पष्ट शब्दात ही सगळी अफवा असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्रिपदासाठी माझ्या नावाची जी चर्चा सुरू आहे. त्यात कुठलेही तथ्य नाही. आमचे नेते देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहेत आणि तेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे.
- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT