पुणे

पुणे : सर्वच राजकीय पक्षांचे ‘आय लव्ह’; शहरात तब्बल 76 ठिकाणी स्ट्रक्चर, एलईडी, डिजिटल नामफलक

अमृता चौगुले

हिरा सरवदे
पुणे : शहरातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांसह स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रेमाला उधाण आल्याचे दैनिक 'पुढारी'ने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. प्रशासन आणि नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात तब्बल 76 ठिकाणी 'आय लव्ह….' स्ट्रक्चर, एलईडी आणि डिजिटल नामफलक आहेत. यामध्ये भाजपचे सर्वाधिक 32 ठिकाणी असून, 22 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असलेल्यांनी स्ट्रक्चर आणि एलईडी फलक उभारले आहेत.

महापालिका आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर तत्काळ स्वागत करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही यामध्ये मागे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील विविध रस्त्यांवर आणि चौकांमध्ये 'आय लव्ह…' अशा आशयाचे त्या-त्या भागाचे नाव असलेले स्ट्रक्चर, एलईडी व डिजिटल नामफलक मोठ्या प्रमाणात उभारण्यात आले आहेत. राजकीय दबावापोटी क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिकार्‍यांनी स्ट्रक्चर उभारले, त्याची बिलेही अदा केली.

मात्र, या माध्यमातून नगरसेवकांनी केलेल्या चमकोगिरीविरोधात दैनिक 'पुढारी'ने वृत्तमालिका केल्यानंतर आणि सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांनी टीका केल्यानंतर महापालिका आयुक्तांनी 'आय लव्ह…', स्ट्रक्चर, एलईडी व डिजिटल नामफलकसंदर्भात अहवाल देण्याचे व ते काढण्याचे आदेश दिले.

महापालिका आयुक्तांनी आदेश दिल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी वेळ न दवडता आयुक्तांच्या निर्णयाचे स्वागत करीत पालिकेत पाच वर्षे सत्ता असलेल्या भाजपवर टीका केली. सत्ता असताना ज्यांना कामे करता आली नाहीत, त्यांनी प्रसिद्धीसाठी उथळपणे आणि बेकायदा 'आय लव्ह…'चे स्ट्रक्चर उभारल्याचा आरोप केला. आयुक्तांचे हे आदेश पुढील नगरसेवकांना मार्गदर्शक ठरतील, असेही त्यांनी म्हटले होते.

या सर्व पार्श्वभूमीवर दैनिक 'पुढारी'च्या प्रतिनिधीने शहरातील सर्वच भागांतील 'आय लव्ह…' स्ट्रक्चर, एलईडी व डिजिटल नामफलकांचा आढावा घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसही यामध्ये मागे नसल्याचे समोर आले. ज्या प्रभागांत राष्ट्रवादीचे आणि ज्या प्रभागांतच भाजपचे नगरसेवक आहेत, त्या प्रभागांत त्यांच्याच नगरसेवकांनी सर्वाधिक स्ट्रक्चर, एलईडी व डिजिटल नामफलक उभारले आहेत.

अधिकार्‍यांकडून माहिती लपविण्याचा प्रयत्न
महापालिका आयुक्तांनी 'आय लव्ह…' स्ट्रक्चर, एलईडी व डिजिटल नामफलकांचा अहवाल देण्याचे आदेश दिल्यानंतर अनेक क्षेत्रीय कार्यालयांनी माहिती देण्यास टाळाटाळ करीत जुजबी माहिती दिल्याचे आणि स्ट्रक्चरची संख्या लपविल्याचे 'पुढारी'ने केलेल्या पाहणीत समोर आले. तसेच, 'पुढारी'च्या प्रतिनिधीने वारंवार संपर्क साधून माहिती विचारली असता टाळाटाळ करण्यात आली.

या भागात एकही स्ट्रक्चर नाही
शिवाजीनगर घोले रोड कार्यालयाच्या अखत्यारीत येणार्‍या परिसरात एकाही ठिकाणी 'आय लव्ह…'चे स्ट्रक्चर, एलईडी किवा डिजिटल नामफलक नसल्याची माहिती आकाशचिन्ह विभागाने अहवालात नोंदविली आहे.

कोणत्या पक्षाचे किती स्ट्रक्चर व एलईडी नामफलक ?
भाजप 32
राष्ट्रवादी काँग्रेस 22
शिवसेना 05
एसआयएम 02
काँग्रेस 01
मनसे 01
इतर 13

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT