पौड: माणगांवकडून पुण्याकडे निघालेल हायड्रोक्लोरिक ॲसिडचा टँकर ताम्हिणी घाटावळील डोंगरवाडी येथे निकृष्ट रस्त्यामुळे रविवारी (दि. २५) सकाळी पलटी झाला आहे. यामध्ये कोणतीही जिवितहानी झालेली नाही. दरम्यान टँकरमधून ऍसिड बाहेर पडत असून बाहेर पडलेल्या ऍसिडचा पाण्याचा संपर्क आल्यानंतर त्याचे वायूत रूपांतर होते.
यामुळे परिसरात डोळे चुरचुर हौणे, खोकला येणे किंवा अंगाला खाज येऊ शकते. सध्या याठिकाणी पौड पोलिस, पीएमआरडीएचे अग्निशामक पथक, मुळशी आपत्ती व्यवस्थापनचे पथक,तसेच ज्या कंपनी केमिकल टँकर कंपनीतून निघाला तेथील पथक घटनास्थळावर ॲसिडची गळती रोखण्याचे प्रयत्न करत आहे. पौडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी घटनास्थळावर लक्ष ठेवून आहेत. (Latest Pune News)
कोकणात जाणारा रस्ता पौडमध्ये बंद
डोंगरवाडीजवळ ॲसिडचा टँकर पलटी झाला असून त्यामुळे कोकणात जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात बंद झाली आहे. घटनास्थळाजवळ अनुचित प्रकार घडू नये म्हणून पौड येथे कोकणात जाणारी वाहतूक थांबविण्यात आली होती. पोलिस उपनिरीक्षक योगेश जाधव, हवालदार संतोष दावलकर, चंद्रकांत सोनवणे, विराज कामठे, गौतम लोहकरे, निवास जगदाळे हे पोलिस या पथकाने पौड येथे कोकणात जाणारा रस्ता बंद केला होता.