आळंदी Pudhari
पुणे

आळंदीत कार्तिकी यात्रेची लगबग ; विधानसभा निवडणुकीमुळे प्रशासनावर ताण

; आठ लाख भाविक येणार

पुढारी वृत्तसेवा

विधानसभा निवडणुकीत प्रशासन व्यस्त असताना कार्तिकी यात्रेमुळे प्रशासनावर दुहेरी ताण येणार आहे. निवडणुकीबरोबरच कार्तिकी यात्रेसाठी आळंदीत येणार्‍या भाविकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी स्थानिक प्रशासन, खेड तहसील, एसटी महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा आरोग्य विभाग, पोलिस आयुक्तालय व्यस्त झाले आहे. या यात्रेसाठी आठ लाख भाविक येण्याचा अंदाज आहे.

कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी अनिल दौंडे यांच्या अध्यक्षेखाली बुधवारी (दि. 6) सकाळी अकरा वाजता पालिका टाऊन हॉलमध्ये वारी पूर्वतयारी आढावा बैठक पार पडली. यात कार्तिकी वारी नियोजनाचा आढावा घेण्यात आला. निवडणूक कार्यक्रमामुळे तहसीलदार ज्योती देवरे, हवेली विभागातील महसूलचे अधिकारी, कर्मचारी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी बैठकीला अनुपस्थित होते.

सदर बैठकीत पाणीपुरवठा, विद्युत, वाहतूक प्रश्न, पथ विक्रेत्यांची व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, अतिक्रमण कारवाई, कायदा व सुव्यवस्था आदी महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. तसेच विभागवार आढावा घेण्यात आला. पोलिस बंदोबस्त व पर्यायी मार्गांचा वापर, याबाबत नियोजन करण्यात आले. शहराच्या वेशीवर चारही बाजूंना पार्किंग व्यवस्था व वाहतूक वळविण्याबाबत चर्चा करण्यात आली. भाविकांच्या सोयीसुविधांबाबत प्राधान्याने उपाययोजना करण्याबाबत सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या.

या वेळी सहायक पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह गौर, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अ‍ॅड. राजेंद्र उमाप, विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके, वाहतुकीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश नांदुरकर, दिघी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक विनायक पाटील, वारकरी महामंडळ उपाध्यक्ष डी. डी. भोसले पाटील, माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुर्‍हाडे, सचिन गिलबिले, राजाभाऊ चोपदार, प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, मच्छिंद्र शेंडे, शिवसेना शहरप्रमुख राहुल चव्हाण, मंडलाधिकारी राजेंद्र वाघ, वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे आदी उपस्थित होते.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

  • आळंदीत 21 तारखेला पोलिस बंदोबस्त तैनात.

  • आळंदीत वाहनांना 21 नोव्हेंबरपासून प्रवेशबंदी.

  • पासधारक वाहनांना प्रवेश देण्यात येणार.

  • निवडणूक निकालानंतर आळंदीत मिरवणुकीवर बंदी.

  • इंद्रायणीला पाणी सोडण्यात येणार.

  • दर्शनबारी जागेचा प्रश्न तात्पुरता मार्गी.

  • देवस्थानकडून दिंड्यांना राहण्यासाठी जागा.

  • प्रदक्षिणा मार्गावर नो हॉकर्स झोन.

  • 24 तास आरोग्य सुविधा.

23 पासून यात्रा

आळंदीत कार्तिक वद्य अष्टमी शनिवार (दि. 23) ते अमावास्या शनिवार (दि. 30) दरम्यान कार्तिकी यात्रा पार पडणार आहे. यात दि. 20 पासूनच आळंदीत भाविक येण्यास सुरुवात होणार आहे. त्यासाठी प्रशासनाला दहा दिवस अगोदरच तयारीला लागावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT