विविध मागण्यांसाठी सिमेंट कंपनीसमोर बेमुदत उपोषण Pudhari
पुणे

Pune: विविध मागण्यांसाठी सिमेंट कंपनीसमोर बेमुदत उपोषण

पिकांचे नुकसान, आरोग्य, जमिनीची नापिकी, स्थानिकांना रोजगार, नुकसानभरपाई आदी मुद्दे अग्रभागी

पुढारी वृत्तसेवा

नानगाव/पाटस: पाटस (ता. दौंड) परिसरातील श्री सिमेंट कंपनीच्या विरोधात व वेगवेगळ्या मागण्यांसाठी गुरुवारी (दि. 17) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास जय शिवसंग्राम संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव साळुंखे व दौंड तालुकाध्यक्ष संजय शिंदे यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. या उपोषणाला स्थानिक शेतकर्‍यांनी पाठिंबा दिला आहे.

येथे असलेल्या श्री सिमेंट कंपनीच्या हवेत उडणार्‍या सिमेंटच्या धुलीकणांमुळे परिसरातील शेतकर्‍यांच्या जमिनी नापीक होत असून पिकांचे अतोनात नुकसान होऊन शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यापूर्वी देखील संबंधित कंपनी प्रशासन व प्रदूषण विभाग यांच्याकडे या संदर्भात लेखी तक्रारी करूनही संबंधित विभाग व कंपनीने कोणतीही दखल घेतली नाही.

सिमेंट कंपनीतून उडणार्‍या सिमेंटच्या धुलीकणांमुळे परिसरातील नागरिकांना श्वसन व दम्याचे विकार होत आहेत. त्याचप्रमाणे जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. या चार्‍यांवर सिमेंटच्या धुलीकणांचा थर साचल्याने जनावरे हा चारा खात नाहीत. त्यामुळे शेतकरी एकीकडे जमिनीची वाढणारी समस्या, दुसरीकडे आरोग्य समस्या आणि जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.

उद्योग संचालनालय यांचे आदेशाप्रमाणे तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीच्या पर्यावरणीय ना हरकत दाखल्यासाठी घेतलेल्या जनसुनावणीमधील इतिवृत्तांप्रमाणे स्थानिकांना किमान 80 टक्के रोजगार देण्याचे बंधन असतानाही स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून न देता तालुक्याबाहेरील तसेच जिल्ह्याबाहेरील लोकांना कंपनीत कामे व रोजगार दिलेला आहे. स्थानिकांवर ही कंपनी जाणीवपूर्वक अन्याय करीत असल्याचा उपोषणकर्त्यांचा आरोप आहे.

पाटस हद्दीमधून रस्त्याने सिमेंटची वाहतूक करणारी वाहने ही क्षमतेपेक्षा जादा माल भरून वाहतूक करत असल्याने या ओव्हरलोड मालाच्या वाहतुकीमुळे रस्त्यांवर खड्डे पडून रस्ता खराब झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे रस्त्यावरून शाळेत जाणारी मुले, नागरिक यांच्या जिवाला धोका निर्माण होत असल्याचे लेखी निवेदने वेगवेगळ्या कार्यालयांना जय शिवसंग्राम संघटनेच्या वतीने देण्यात आली आहेत.

मागील अनेक वर्षांपासून मी या कंपनीत काम करत होतो; मात्र कंपनीमुळे होणार्‍या नुकसानीसाठी मी आवाज उठल्यामुळे कंपनीने मला कामावरून काढून टाकले आहे. त्यामुळे जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत लढत राहाणार.
- दीपक टेकवडे, ग्रामस्थ, कानगाव
सिमेंट कंपनीला लागूनच माझी शेती आहे. कंपाउंडच्या कडेला लावलेल्या झाडांचा वसवा आमच्या शेतात होतो. परिणामी या भागात पिके चांगली येत नाहीत, तसेच सिमेंटचे धुलीकण पिकावर पडल्याने पिकांचे व शेतीचे देखील नुकसान होत आहे. कंपनी प्रशासनाने या उपोषणाची दखल घ्यावी.
- संभाजी निंबाळकर, स्थानिक शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT