पुणे

खेड शिवापूर : शेकडो वाहने सोडली जात आहेत मोफत

अमृता चौगुले

खेड शिवापूर; पुढारी वृत्तसेवा : 'स्थानिक नागरिकांना, तसेच टोल नाक्याजवळच्या गावातील वाहनांना आम्ही त्यांचे ओळखपत्र पाहून मोफत सोडत आहोतच. त्याच वेळी तुम्ही पास काढून आम्हाला सहकार्य करावे, अशी विनंती करीत आहोत; मात्र गेल्या काही दिवसांपासून टोल प्रशासनाविषयी वेगळी चर्चा ऐकायला मिळत आहे. ती चर्चा चुकीची असून, चुकीची माहिती पसरविली जात आहे. दररोज हजारो वाहने मोफत सोडली जात आहेत, त्यामुळे चुकीची माहिती पसरविणे थांबवा,' असे आवाहन टोल प्रशासनाचे व्यवस्थापक अमित भाटिया यांनी केले आहे.

दि. 1 फेब्रुवारीपासून स्थानिकांना आम्ही पास काढण्यासाठी विनंती करीत आहोत. त्यामुळे गेल्या 14 दिवसांत 314 जणांनी पास काढलेले आहेत, तर मागील दोन महिन्यांत पास काढणार्‍यांची संख्या ही 600 ते 650 च्या आसपास पोचली आहे. याचा अर्थ आम्ही ज्या स्थानिकांना विनंती करीत आहोत, त्यातील काही स्थानिक हे पास काढत आहेत. ठेकेदार स्वतः बूथवर जाऊन हात जोडून पास काढण्यासाठी विनंती करीत आहेत; मात्र खेड शिवापूर टोलनाका हटाव कृती समिती टोल प्रशासनाविषयी चुकीची माहिती पसरविण्याचे काम करीत आहे. ती त्यांनी थांबवली पाहिजे. दिवसाला शेकडो वाहने मोफत सोडली जातात, याची कल्पना कदाचित कृती समितीला नसेल, असेही या वेळी भाटिया यांनी सांगितले.

स्थानिक वाहनचालकांच्या दररोज आमच्याकडे तक्रारी येत आहेत. मीसुद्धा अनुभव घेतला आहे आणि विशेष म्हणजे बुधवारी झालेल्या बैठकीत स्थानिक नागरिकांचा रोष स्पष्ट दिसून येत होता. त्यामुळे टोल प्रशासन कदाचित खोटे तर बोलत नसेल ना? असा प्रश्न येथे निर्माण होत आहे.
                          ज्ञानेश्वर दारवटकर, निमंत्रक, टोलनाका हटाव कृती समिती

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT