शनिवार रविवार आणि त्यातच जोडून आलेली दीपावली सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडलेले नागरिक आणि पुणे-सातारा महामार्गाचे रखडलेल्या कामामुळे खेडशिवापूर टोल नाक्यासह महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. लांब वाहनाच्या रांगा लागल्या असून शनिवार सकाळपासून प्रवाशांना दोन तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
जोडुन आलेली सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक बाहेर पडल्या कारणाने पुणे-सातारा रोडवरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी झाली आहे. त्यातच प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्षामुळे पुणे सातारा महामार्गाची वाट लागली आहे. सातारा बाजूला जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
खेडशिवापुर टोलनाक्या मागे तीन किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तर खेडशिवापुर टोलनाका सोडल्यानंतर देखील खोपी शिवरे, वरवे या गावापर्यंत जवळपास पाच किलोमीटरचे वाहना रांगा लागले आहेत. सुट्ट्यामधील वाहतूक कोंडीचा अनुभव असतानाही यासंदर्भात प्रशासन ठोस नियोजन करण्यात अपयशी होत असून प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी शनिवारी सकाळपासूनच पुणे व मुंबईकर मोठ्या संख्यने बाहेर पडले आहेत. सकाळपासूनच पुणे-सातारा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली असल्याने शिवरे येथील उड्डाणपुलाच्या काम करणारे निखिल कन्स्ट्रक्शन कडून कामाला गती नसल्याने लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
काही वाहने खोपी येथील उड्डाण पुलाच्या खालून विरुद्ध दिशेला वाहने प्रवासी दामटत असल्याने दोन्ही बाजूला वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडत आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. ढिसाळ कारभारामुळे या रांगा वाढतच गेल्या त्यामुळे एकंदरीतच सुट्टी एन्जॉय करण्यासाठी निघालेल्या पर्यटकांना वाहतूक कोंडीमुळे मोठ्या प्रमाणात वेळ खर्च झाल्या कारणाने मनस्ताप सहन करावा लागत आहे.