पुणे

पिंपरी : ‘पुढारी’ फूड फेस्टिव्हलला उदंड प्रतिसाद, शनिवार ठरला नागरिकांसाठी खास

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  दैनिक 'पुढारी' वृत्तसमूहातर्फे आयोजित व चकोते ग्रुप प्रस्तुत कोल्हापुरी शॉपिंग अ‍ॅण्ड फूड फेस्टिव्हलच्या तिसर्‍या दिवशी शनिवारी सुटीचा दिवस असल्याने नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या महोत्सवाचे सहप्रायोजक लोकमान्य मल्टिपर्पज को – ऑपरेटिव्ह सोसायटी, स्मिता हॉलिडेज ट्रॅव्हल पार्टनर, कुंदन ह्युंदाई यांच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शाहूनगर येथील बहिरवाडे मैदान या ठिकाणी हा खाद्य व खरेदी महोत्सव 17 ऑक्टोबरपर्यंत नागरिकांसाठी सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू आहे.

महोत्सवास गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. खास कोल्हापुरी खाद्यपदार्थांची रेलचेल असलेल्या या महोत्सवास शहरातील सर्व भागांतून नागरिक भेट देत आहेत. येथे असलेल्या कोल्हापुरी पदार्थांचा नागरिक मनसोक्त आस्वाद घेताना दिसत आहेत. महोत्सवात कोल्हापुरी चिकन, मटण, भेळ, मिसळ, चायनीज, वडा कोंबडा, मटण खिमापाव, थालीपीठ, स्प्रिंग रोल, कोल्हापुरी प्रसिद्ध वांगे व बाजरी भाकरी, कोल्हापुरी बिर्याणी, बांबू बिर्याणी, पावभाजी, आप्पे, स्पंज डोसा, ज्यूस अशा विविध स्टॉल्सला नागरिक भेट देऊन खरेदी केली; तसेच सहकुटुंब खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना दिसत होते. प्रदर्शनात विविध प्रकारच्या
वस्तू खरेदीचा आनंदही महिला व पुरुष घेत आहेत.

प्रदर्शनात ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिक दुचाकी, घरगुती साहित्यामध्ये आटा चक्की, घरगुती तेलाचा घाणा, कपडे, घरगुती साहित्य, बेकरी उत्पादने, दिवाळी सजावट साहित्य, इमिटेशन ज्वेलरी, टीव्ही कव्हर, पडदे, साड्या, स्टेशनरी साहित्य, मसाजर, डेअरी उत्पादने, सर्व प्रकारचे मसाले याशिवाय विविध वस्तू खरेदीची संधी नागरिकांना मिळत आहे.

या कलाकारांनी  दिली महोत्सवास भेट महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी शुक्रवारी 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेतील अद्वैत – अजिंक्य ननावरे, नेत्रा – तितीक्षा तावडे, 'दार उघड बये' मालिकेतील मुक्ता – सानिया चौधरी, सारंग – रोशन विचारे आणि किचन कलाकारमधील प्रणव रावराणे यांनी महोत्सवास भेट दिली. या वेळी महोत्सवातील प्रत्येक स्टॉलवर भेट देऊन पाहणी केली; तसेच नागरिकांशी संवाद साधला.

मनोरंजनपर कार्यक्रमांची मेजवानी
महोत्सवाच्या ठिकाणी खरेदी आणि खाद्यपदार्थांच्या आस्वादाबरोबर नागरिकांना समधुर गीतांची मेजवानीदेखील मिळत आहे. खाद्य खरेदी धम्मालमध्ये गायक सचिन सोनटक्के आणि जिना शहा यांनी हिंदी-मराठी गाण्याची मैफील सादर केली.

आजचे आकर्षण
महोत्सवात रविवारी (दि.16) सायंकाळी सहा वाजता कलर्स मराठी वाहिनीवरील 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतील लतिका, देवव्रत व दौलत म्हणजेच अनुक्रमे अक्षया नाईक, कुणाल धुमाळ व हृषिकेश शेलार हे भेट देणार आहेत. या वेळी ते नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

कधी : दि. 13 ते 17 ऑक्टोबर 2022
वेळ : सकाळी 10 ते रात्री 9
स्थळ : राजर्षी शाहूमहाराज ग्राउंड, महाबली मंदिर रोड, साई निकेतन हौसिंग सोसायटी, शाहूनगर, चिंचवड, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT