पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च 2026 मध्ये घेतल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह 4 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव दीपक माळी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. (Latest Pune News)
राज्य मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले, मात्र काही कारणांमुळे परीक्षा अर्ज भरण्यापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षा देऊ इच्छिणारे विद्यार्थी या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरू शकतात. राज्य मंडळातर्फे विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी ही अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.
सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी कॉलेज प्रोफाइल मध्ये कॉलेज संस्था मान्यताप्राप्त विषय शिक्षक याबाबत योग्य माहिती भरून राज्य मंडळाकडे पाठवणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांचा अपार आयडी उपलब्ध आहे त्यांची नोंद ऑनलाईन अर्जामध्ये करण्यात यावी, अशी सूचना राज्य मंडळातर्फे देण्यात आली आहे.