राहुल हातोले
पिंपरी : नितीन मंचक यांची पत्नी भारती मंचक हे कामावरून घरी जात असताना भरती यांचे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत निधन झाले. पत्नीला घरी यायला उशीर झाला. म्हणून तिच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न त्यांचे पती नितीन करत होते; मात्र फोन उचलत नसल्याने पत्नीच्या कामाच्या ठिकाणी जाण्याच्या तयारीत असताना कामाच्या ठिकाणाहून फोन आला आणि ही घटना कळली.
पत्नी हे जग सोडून गेली ही बाब आता मी माझ्या मुलांना कस सांगू अशा शब्दात जोरजोरात टाहो फोडून नितीन मंचक रडत होते. पती, पत्नी आणि आठ वर्षांचा मुलगा व चार वर्षांची एक मुलगी असा चौघांचा संसार होता. मुलाला लहानपणापासून किडनीचा आजार होता. त्यामुळे त्याचा दवाखाना सुरू होता.
परिस्थिती नाजूक असली तरी मुलांना चांगलं शिक्षण द्यायचा असा आम्ही निश्चय केला होता… म्हणून दोघेही काम करून घर चालवत होतो. दुसर्या दिवशी मुलाची शाळेची फी भरायची होती. त्यासाठी पत्नीकाम करून पैसे जमा करत होत्या. पती-पत्नी दोघं दिवसरात्र कष्ट घेत होते; मात्र काळाने घात केला आणि पत्नीला हिरावून घेतलं. मी घरी गेल्यावर मुलांना कसं सांगू की त्यांची आई गेली, असे म्हणून नितीन मंचक यांनी टाहो फोडला.
दरम्यान, माजी मंत्री बाळा भेगडे यांनी वायसीएम रुग्णालयात येऊन मृतांच्या नातेवाइकांना भेट देत त्यांचे सांत्वन केले. या वेळी नातेवाइकांनी पालिका प्रशासनाविरूद्ध रोष व्यक्त केला. या वेळी भेगडे यांनी सदर घटनेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याबाबत आपण राज्य सरकारकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले; तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे भेट देणार असल्याचेही ते म्हणाले.