टाकळी भीमा: शिरूर तालुक्यात प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेची 1 हजार 461 घरकुले मंजूर झालेली आहेत. तालुक्यातील 107 गावांत घरकुल बांधण्यासाठी लाभार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे. 1 हजार 461 मंजूर घरकुलांपैकी 1 हजार 70 लाभार्थ्यांना घरकुलाचे फाउंडेशन करण्याकरिता 15 हजार रुपयांचा पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे.
मात्र, घरकुल बांधण्यासाठी किमान चार ते पाच लाख रुपयांच्या पुढे खर्च येतो. 1 लाख 20 हजार रुपये मिळणार्या अनुदानात घरकुले बांधायची कशी? या विचारात लाभार्थी आहेत. शासनाने घरकुलाचे अनुदान वाढवावे, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून होऊ लागली आहे.
ग्रामीण भागातील गोरगरिबांना कच्च्या घरातून पक्क्या घरात नेण्यासाठी शासनाकडून पंतप्रधान आवास योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 1 लाख 20 हजार रुपये अनुदान दिले जाते.
परंतु, घर बांधण्यासाठी किमान चार ते पाच लाखांपेक्षा अधिक खर्च येत असल्याने शासनाने दिलेले अनुदान अपुरे पडत आहे. एवढ्यात घरे बांधायची कशी? असा प्रश्न लाभार्थी उपस्थित करू लागले आहेत.
बांधकाम साहित्याचे दर खूप वाढलेले आहेत. वाळू, सिमेंट, विटा, लोखंडी सळया, सिमेंट पत्रे, दारे, खिडक्या, फरशी आणि इतर साहित्याचे दर गरिबांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. मजुराचे दर देखील वाढलेले आहेत. त्यामुळे अनुदान मागणीकडे दुर्लक्ष होत असून, पुन्हा कर्ज घेण्याशिवाय त्यांना पर्याय नसल्याचे दिसून येत आहे.
चार हप्त्यांत मिळणार पैसे
गवंडी, मजूर, सुतार व इतर व्यावसायिकांना यामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे. काही कामे मजुरीवर केले जात आहेत, तर काही कामे ठोक रक्कम ठरवून लाभार्थ्यांकडून घेतली जातात. घरासाठी पहिला हप्ता 15 हजार रुपये फाउंडेशन झाल्यावर, तर दुसरा हप्ता थेट 70 हजार रुपये दिला जाणार आहे.
या हप्त्यामध्ये घराच्या लेटेनपर्यंत काम करावे लागणार आहे. त्यानंतर तिसरा हप्ता लेटेनपर्यंत 30 हजार रुपये आणि घरकुलासह शौचालय पूर्ण झाल्यानंतर शेवटचा चौथा 5 हजार रुपयांचा हप्ता दिला जाणार आहे. शिरूर सांख्यिकी विभागाच्या विस्तार अधिकारी स्नेहल माकर यांनी ही माहिती दिली.