नाणे : पुढारी वृत्तसेवा : नाणे मावळमधील साबळेवाडी येथे अचानक लागलेल्या आगीत घर जळून खाक झाले. यामध्ये घरातील मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या आहेत. गुरुवारी (दि.5) पहाटेच्या सुमारास नाणे मावळातील साबळेवाडी येथील सोमनाथ साबळे यांच्या घराला आग लागली. पहाटेच्या सुमारास अचानक धुराचा वास येऊ लागल्याने घरातील सोमनाथ साबळे व गणेश गरवड यांनी आरडा-ओरडा केला.
परंतु, तोपर्यंत सर्व घर जळून खाक झाले होते. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. घरातील सर्व मौल्यवान वस्तू, कपडे, टी. व्ही., फ्रिज जळून खाक झाल्याने गरवड व साबळे कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अचानक लागलेली आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. घराला अचानक आग लागल्याने साबळे कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, अशी मागणी करंजगावच्या सरपंच दीपाली साबळे यांनी केली आहे.