पुणे

कुरुंगवडीमध्ये घराला आग, चौघे जखमी; 25 ते 30 लाखांचे नुकसान

Sanket Limkar

नसरापूर : पुढारी वृत्तसेवा : कुरुंगवडी (ता. भोर) गावात शॉर्टसर्किट होऊन घराला लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्याची राखरांगोळी झाली. आगीवर नियंत्रण मिळविताना अचानक घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यात चौघे जण गंभीर जखमी झाले असून एक जण अत्यवस्थ आहे. सुदैवाने घरातील सर्वांना बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली. या घटनेत जवळपास 25 ते 30 लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी ( दि.4) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

कुरुंगवडी येथील संदीप संपत शिळीमकर आणि धनाजी संपत शिळीमकर यांच्या कौलारू घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. घरातून आगीचे लोळ बाहेर पडू लागल्यानंतर शेजाऱ्यांनी आरडाओरड केला. पाणी टाकून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला, पण हे प्रयत्न निष्फळ ठरले. अग्निशामक दलाचा बंब पोहोचल्यानंतर आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत घराची अक्षरश: राख झाली होती.

या आगीत बाळू कचरे, राहुल शिळीमकर, संदीप शिळीमकर, मिताली शिळीमकर हे जखमी झाले असून बाळू कचरे याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे, सरपंच अंजली ननवरे, राजगडचे पोलिस उपनिरीक्षक संजय ढावरे, पोलिस हवालदार अजित माने, जवान मंगेश कुंभार, महावितरणचे कर्मचारी, पोलिस पाटील नरेश शिळीमकर आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे.

आगीवर नियंत्रण मिळविताना गॅस सिलिंडरचा स्फोट

दरम्यान, आग लागल्यानंतर घरातील सर्व जण बाहेर पडले तसेच गोठ्यातील जनावरे बाहेर काढण्यात आली. आगीवर नियंत्रण मिळविताना अचानक गॅस सिलिंडर टाकीचा स्फोट झाला. यात लाकडी वाश्यातील कौलारू घर काही क्षणात कोसळले. घरातील रोख चार लाखांची रोकड आणि सोने, तसेच टीव्ही, कपडे, भांडी व इतर दैनंदिन वस्तू जळून खाक झाल्या.

SCROLL FOR NEXT