बारामती: हॉटेलमध्ये व्यवस्थापकाचे काम करणार्याने मालकाचा विश्वास संपादन करून रजिस्टरला बनावट ग्राहकांची नावे टाकत त्यांच्या नावे उधारी दाखवत मालकाची 34 लाख 33 हजार रुपयांची फसवणूक केली.
याप्रकरणी दत्तात्रय पोपटराव खुळे (रा. माळेगाव, ता. बारामती) याच्याविरोधात बारामती शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अतुल उद्धव पवार (रा. जगतापमळा, बारामती) यांनी फिर्याद दिली. (Latest Pune News)
फिर्यादीने बारामती व परिसरात चार हॉटेल चालविण्यासाठी घेतली आहेत. तेथे व्यवस्थापक व कर्मचारी नेमले आहेत. शहरानजिक इंदापूर रस्ता येथे हॉटेल सूरज परमिट रुम व बिअरबार त्यांनी चालविण्यासाठी घेतला होता. तेथे खुळे हे 2018 पासून काम पाहत होते. अनेक वर्षे तो कामावर असल्याने विश्वास संपादन केला होता.
जुलै 2024 मध्ये पवार हे स्वतः हॉटेलमध्ये लक्ष घालू लागले. या दरम्यान एका ग्राहकाला त्यांनी उधारीबाबत हटकले असता त्यांनी सर्व उधारी चुकती केल्याचे सांगितले. त्यामुळे मालकाला शंका आल्याने त्यांनी रजिस्टर तपासणी सुरू केली. 1 जानेवारी 2024 ते 26 जुलै 2024 या काळातच 105 लोकांच्या नावापुढे 5 लाख 31 हजार रुपयांची उधारी असल्याचे दिसून आले. हा हिशेब खुळे यांनी स्वतःच्या अक्षरात लिहिलेला होता.
उधारी वाढत चालल्याने पवार यांनी विचारणा केली असता महिनाभरात उधारी वसूल होईल, असे खुळे यांनी सांगितले. त्यानंतर 2018 पासून रजिस्टर कुठे आहेत, अशी विचारणा केली असता ती गहाळ झाल्याचे खुळे यांनी सांगितले.
खुळे हे जाणीवपूर्वक रजिस्टर देत नसल्याचे मालकाच्या लक्षात आले. खुळे यांनी 2021 ते 2024 या कालावधीतील रजिस्टरमध्ये उधारीच्या नावाखाली 32 लाखाचा अपहार केल्याचे मालकांच्या लक्षात आले. रजिस्टरमध्ये ग्राहकांची नावे अर्धवट टाकणे, पूर्ण पत्ते, मोबाईल क्रमांक नसणे आदी बाबी समोर आल्या. त्यानंतर खुळे याने उधारी वसूल करण्यास मालकासोबत येणे टाळले. तसेच आजारी असल्याचे सांगत कामावर येणेही बंद केले.
सीएकडून मालकाने रजिस्टरची तपासणी करून घेतली असता एकूण 34 लाख 33 हजार रुपयाचा अपहार झाल्याचे लक्षात आले. खुळे याला याबाबत सांगितले असता त्याने पोलिसांत तक्रार देऊ नका, मी जागा खरेदी केली असून, ती विकून पैसे देतो, असे आश्वासन मालकाला दिले. परंतु, त्यानंतरही पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.