Hotel Gavaran Bandhu Owner Post ViralHotel Gavaran Bandhu Owner Post Viral 
पुणे

Business tips: हॉटेल सुरू करताय? आधी हे वाचा; बंद पडलेल्या 'गावरान बंधू'च्या तरुण व्यावसायिकाची पोस्ट Viral

"आजपासून आपलं हॉटेल कायमस्वरूपी बंद राहील... कारण की आपण जे सपान पाहून हॉटेल चालू केलं होतं तसं काई होताना दिसत नाई..." हे शब्द आहेत अमित मरकड यांचे.

shreya kulkarni

Hotel Gavaran Bandhu Owner Post Viral

पुणे : "आजपासून आपलं हॉटेल कायमस्वरूपी बंद राहील... कारण की आपण जे सपान पाहून हॉटेल चालू केलं होतं तसं काई होताना दिसत नाई..." हे शब्द आहेत अमित मरकड यांचे. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी मोठ्या उत्साहाने आणि स्वप्नांनी सुरू केलेलं 'हॉटेल गावरान बंधू' बंद करावं लागल्याची खंत आणि त्यामागची कारणमीमांसा त्यांनी एका फेसबुक पोस्टमधून अत्यंत प्रामाणिकपणे मांडली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, हॉटेल व्यवसायात उतरू पाहणाऱ्या अनेक नवउद्योजकांसाठी एक उदाहरण ठरत आहे.

व्यवसायात आलेले अपयश लपवण्याऐवजी, ते स्वीकारून त्यातून काय शिकलो हे जगाला सांगण्याचं धाडस अमित यांनी दाखवलं आहे. त्यांची ही पोस्ट म्हणजे केवळ एका हॉटेलच्या बंद होण्याची कहाणी नाही, तर ती एका तरुण उद्योजकाने घाईत घेतलेल्या अनुभवांचा आणि त्यातून शिकलेल्या धड्यांचा एक खुला लेखाजोखा म्हणणं वावगं ठरणार नाही.

अमित मरकड यांचा मूळ व्यवसाय 'गावरान बंधू शेतकरी उत्पादक कंपनी'चा आहे, ज्याअंतर्गत ते हिवाळ्यात हुरडा पार्टीचे आयोजन करतात. हा व्यवसाय केवळ तीन महिने चालत असल्याने उरलेल्या वेळेत काय करायचं, हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. नोकरीत मन रमत नसल्याने आणि जन्मतःच प्रयोगशील स्वभाव असल्याने त्यांनी स्वतःचे हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेतला.

पुण्यातील नवले मेडिकल कॉलेजसमोर दोन मित्रांसोबत भागीदारीत त्यांनी 'हॉटेल गावरान बंधू' सुरू केले. सुरुवातीला गुंतवणूक तीन भागांत विभागली गेल्याने आर्थिक भार कमी होता. "प्रयोग फसला तरी मोठं नुकसान होणार नाही आणि यशस्वी झाला तर भविष्यात मोठा विचार करता येईल," या विचाराने त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला. पण इथेच त्यांची पहिली चूक झाली.

नेमक्या काय चुका झाल्या?

अमित यांनी आपल्या पोस्टमध्ये अपयशाची कारणे अत्यंत स्पष्टपणे मांडली आहेत. ते म्हणतात, "हॉटेल व्यवसायाचे कुठलेही ज्ञान, अनुभव किंवा कौशल्य नसताना मी फॉर्ममध्ये येऊन क्रीज सोडली आणि काही कळायच्या आत स्टंप-आऊट झालो."

अनावश्यक खर्च: हॉटेलच्या इंटेरियर, आकर्षक लाईटिंग आणि मोठ्या नावाच्या बोर्डवर त्यांनी मोकळ्या हाताने खर्च केला.

अवलंबित्व: तिघांपैकी कुणालाही स्वयंपाकाचे कौशल्य नसल्याने त्यांना आचारी, चपाती-भाकरी बनवणाऱ्या महिला आणि इतर कामगार ठेवावे लागले. यामुळे पगार, भाडे, लाईट बिल, किराणा आणि इतर खर्च लाखाच्या घरात पोहोचला.

चुकीचे नियोजन: हॉटेलच्या परिसरातील ग्राहकांचा (बहुतांश विद्यार्थी) अभ्यास न करता त्यांनी मेन्यू आणि त्याच्या किमती ठरवल्या. क्वालिटी चांगली असूनही, जास्त किमतीमुळे ग्राहकांनी पाठ फिरवली.

मार्केटिंगचा अभाव: प्रभावी मार्केटिंग करण्यात ते कमी पडले. स्विगी, झोमॅटोसारख्या प्लॅटफॉर्मवर तीन महिन्यांत नोंदणीही करू शकले नाहीत.

उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याने पहिला महिना चिंतेत, दुसरा आशेवर आणि तिसरा महिना निराशेत गेला. अखेर, आणखी नुकसान टाळण्यासाठी त्यांनी १ जुलैपासून हॉटेल बंद करण्याचा कटू निर्णय घेतला.

अपयशातून शिकलेले धडे: नव्या उद्योजकांसाठी कानमंत्र

आपल्या अनुभवातून इतरांचे नुकसान होऊ नये, या हेतूने अमित यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत, जे प्रत्येक नवीन उद्योजकाने लक्षात ठेवावेत:

खर्चाचे नियोजन: हॉटेल व्यवसायात ५०% पेक्षा जास्त नफा मिळू शकतो, पण खर्चाचे नियोजन जमलेच पाहिजे.

कौशल्य: जे विकायचे आहे, ते स्वतःला बनवता येत असेल तर उत्तम. अन्यथा खर्चाचा अचूक अंदाज हवा.

ग्राहक आणि किंमत: ज्या भागात व्यवसाय करायचा आहे, तिथल्या लोकांची खर्च करण्याची क्षमता ओळखून वस्तूंची किंमत ठरवावी.

भागीदारी: डोळे झाकून विश्वास असेल तरच पार्टनर घ्या आणि शक्यतो दोनपेक्षा जास्त नकोत.

आर्थिक शिस्त: व्यवसायाच्या गल्ल्यातील एक रुपयाही वैयक्तिक कामासाठी वापरू नये. प्रत्येक रुपयाचा हिशोब महत्त्वाचा.

कर्ज: खात्यात नफा शिल्लक असेल किंवा मजबूत बॅकअप प्लॅन असेल, तरच कर्ज काढावे.

अपयश पचवा: "यशस्वी झालात तर माजू नये आणि अयशस्वी झालात तर लाजू नये," असे ते म्हणतात. "यश पचवता नाही आलं तरी चालेल, पण अपयश पचवता आलं पाहिजे."

अमित मरकड यांची ही पोस्ट म्हणजे स्टार्टअपच्या जगात वावरणाऱ्या प्रत्येकासाठी एक आरसा आहे. स्वप्न पाहणे सोपे आहे, पण ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी केवळ उत्साह नाही, तर योग्य नियोजन, अभ्यास आणि आर्थिक शिस्त यांचीही गरज असते, हाच संदेश या अनुभवातून मिळतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT