पुणे

जैववैद्यकीय कचरा निर्मूलनाकडे रुग्णालयांचे दुर्लक्ष; उघड्यावर कचरा टाकण्याच्याही घटना

Sanket Limkar

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मोशी येथील सामायिक जैववैद्यकीय कचराप्रक्रिया केंद्रात सध्या दररोज 3 टन जैववैद्यकीय कचर्‍यावर (बायोमेडिकल वेस्ट) प्रक्रिया केली जात आहे. महापालिकेकडून ही व्यवस्था करण्यात आलेली असताना काही खासगी रुग्णालये त्याकडे सर्रास दुर्लक्ष करीत आहेत. यापूर्वी उघड्यावर बायोमेडिकल वेस्ट टाकण्याच्या घटनादेखील उजेडात आलेल्या आहेत.

वाहनांची संख्या अत्यल्प

महापालिकेच्या वतीने पास्को इन्व्हर्न्मेंटल सोल्युशन या कंपनीच्या सहकार्याने शहरातील रुग्णालये व दवाखान्यांमध्ये दररोज निर्माण होणारा जैववैद्यकीय कचरा गोळा केला जातो. तब्बल 625 रुग्णालये आणि 2 हजार 700 दवाखाने हे त्यासाठी नोंदणीकृत आहेत. दररोज सुमारे 3 टन इतका कचरा गोळा केला जात आहे. 5 वाहनांमार्फत हा कचरा गोळा होत आहे. शहरातील रुग्णालये व दवाखान्यांची नोंदणीची संख्या लक्षात घेता बायोमेडिकल वेस्ट गोळा करण्यासाठी असलेल्या वाहनांची संख्या अत्यल्प आहे.

केंद्राची प्रतिदिन क्षमता 17.9 टन

महापालिकेच्या पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) दररोज 2 टन जैववैद्यकीय कचर्‍यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असणारे केंद्र होते. हे केंद्र 2022 मध्ये बंद करण्यात आले. दरम्यान, मोशी येथील जागेत ऑगस्ट 2023 मध्ये 17.9 टन प्रतिदिन क्षमतेचे सामायिक जैववैद्यकीय कचराप्रक्रिया केंद्र सुरू केले. पुढील 12 वर्षांचा विचार करून संबंधित केंद्राची क्षमता वाढविली आहे. बायोमेडिकल वेस्ट गोळा करण्यासाठी सध्या रुग्णालयांकडून प्रतिदिन प्रतिबेडसाठी (खाटा) 8.16 रुपये हा दर आकारला जात आहे. तर, दवाखान्यांसाठी 4 हजार 39 रुपये इतके वार्षिक शुल्क घेण्यात येत आहे. 2035 पर्यंत या कामासाठी मुदत दिलेली आहे.

महापालिका आकारते दंड

बायोमेडिकल वेस्टचे निर्मूलन करण्यासाठी प्रामुख्याने दोन प्रक्रियांचा वापर
केला जातो. इन्सनरेशन आणि ऑटोक्लेव्ह यांचा त्यामध्ये समावेश आहे.
शहरातील रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये निर्माण होणारा जैववैद्यकीय कचरा (बायोमेडिकल वेस्ट) उघड्यावर टाकला जाऊ नये म्हणून महापालिकेच्या वतीने अशाप्रकारे उघड्यावर कचरा टाकणारी रुग्णालये आणि दवाखान्यांना दंडदेखील केला जात आहे, अशी माहिती वैद्यकीय विभागातील सूत्रांनी दिली. दरम्यान, याबाबत महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्याशी संपर्क साधला. मात्र, ते उपलब्ध झाले नाही.

जैववैद्यकीय कचरा म्हणजे काय ?

जैववैद्यकीय कचरा म्हणजे, जो रुग्णालयात आणि प्रयोगशाळेत उत्पन्न होतो. तसेच, जो आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. जैववैद्यकीय कचरा हा स्थायी व द्रव स्वरुपी असतो.

जैववैद्यकीय कचरा : इंजेक्शनच्या सीरिंज, सलाईनच्या बाटल्या व नळ्या, एकदा वापरलेल्या सुया, ब्लेड्स, रक्ताने माखलेले कापसाचे बोळे, मुदत संपलेली औषधे, खराब रक्त, आवरण पट्टी, शस्त्रक्रिया करून काढलेले शरीराचे अवयव आदींचा जैववैद्यकीय कचर्‍यात समावेश होतो.

SCROLL FOR NEXT