पुणे

बारामतीचा बागायती पट्टाही उन्हाने होरपळला

अमृता चौगुले

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यात गेली सलग दोन दिवस उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून बागायती पट्टा असलेला तालुका अक्षरशः होरपळून निघाला आहे. सकाळपासूनच घामांच्या धारांनी नागरिक हैराण झाले असून तापमान 40 अंश सेल्सिअसवर गेले आहे. कित्येक वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद बारामतीत होत आहे. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले उन्हाने हैराण झाली आहेत.

गेल्या आठवड्यात तालुक्यात ठिकठिकाणी अवकाळीने हजेरी लावली. अवकाळीनंतर कडक उन्हाने अंगाची लाही लाही होत आहे. उन्हामुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. रात्रंदिवस कुलर, फॅन, एसी सुरू राहात आहेत आणि त्यात विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक अधिकच त्रस्त झाले आहेत.

उन्हामुळे तरकारी पिके कोमेजून जात आहेत. विहिरी, कूपनलिका, तलावातील पाणीपातळीत घट झाली आहे. वाढत्या उन्हामुळे शेतकरी सकाळच्या सत्रातच शेतातील कामे उरकून घेत आहेत. जनावरांना सावलीचा आधार देण्यात शेतकरी पुढाकार घेत आहेत. सकाळी 10 वाजेनंतर रस्त्यावरील गर्दी कमी होत आहे. रसवंतीगृहे ग्राहकांनी फुलून गेली आहेत. आईस्क्रिम पार्लर, थंड पेय दुकानांवर ग्राहकांची गर्दी वाढली आहे. गॉगल, टोपी, छत्री, स्कार्प घालूनच तरुण- तरुणी घराबाहेर पडत आहेत.

उन्हापासून बचावासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. ग्रामीण भागात विहिरी व कालव्यात पोहण्यासाठी बच्चेकंपनी गर्दी करत आहेत. हवामान विभागाने पुढील पाच दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली असल्याने बारामतीकरांना काळजी घ्यावी लागणार आहे.

सायंकाळच्या लग्नाला आता पसंती

सध्या लग्नसराईमुळे बाजारपेठा गजबजलेल्या आहेत. वाढत्या उन्हाचा दुपारी होणार्‍या लग्नाला फटका बसत आहे. वर्‍हाडी मंडळी घामांच्या धारांनी हैराण झाले असून, सायंकाळच्या लग्नाला पसंती दिली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT