पुणे

पिंपरी-चिंचवड, मावळात ‘होम स्टे’वाढले

अमृता चौगुले

नंदकुमार सातुर्डेकर : 

पिंपरी : पर्यटकांना स्वस्त दरात घरगुती पद्धतीने राहण्याची व जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून देणारी 'होम स्टे' संकल्पना पिंपरी चिंचवड व विशेषतः मावळात बाळसे धरू लागली आहे. कोरोनामुळे पर्यटकांवर बंधने आल्यामुळे पर्यटन व्यवसाय अडचणीत आला. पर्यटन व्यवसायावर आधारलेले टुरिस्ट गाड्या, हॉटेल्स, रिसॉर्ट आणि तेथे काम करणारे कर्मचारी, पर्यटनस्थळी छोटे-मोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक अडचणीत आले.

पिंपरी चिंचवड परिसर आणि मावळात अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्यात चिंचवडचे श्रीक्षेत्र मोरया गोसावी मंदिर, चापेकर बंधू स्मारक, दुर्गादेवी टेकडी, तीर्थक्षेत्र देहू, आळंदी, कार्ला येथील लेणी, एकवीरा देवी, लोणावळा येथील भुशी धरण, टायगर व लायन्स पॉइंट, गिधाड तलाव, सहारा पूल धबधबा, घोरावडेश्वर, दुधीवरे येथील प्रतिपंढरपूर, शिरगाव येथील प्रतिशिर्डी, बिर्ला गणपती, लोहगड, विसापूर किल्ला, हाडशी आदींचा समावेश आहे.

पर्यटनास 'अच्छे दिन'
मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे पर्यटनावर घातलेल्या बंधनांमुळे पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेले टुरिस्ट गाड्या, हॉटेल्स, रिसॉर्ट तेथे काम करणारे कर्मचारी, पर्यटनस्थळी छोटे-मोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक अडचणीत आले. आता पर्यटनस्थळे खुली झाल्याने पर्यटनास चांगले दिवस येण्याची आशा व्यावसायिकांना आहे.

परिसरातील लोकसंस्कृतीची मिळते माहिती
प्रसिद्ध पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी होत असते. पर्यटकांच्या निवास व्यवस्थेसाठी विविध हॉटेल्स, रिसॉर्ट सज्ज असतात. पर्यटकांना पर्यटनस्थळाला भेट देण्यासोबतच स्थानिक खाद्यसंस्कृती, लोकसंस्कृती यांचाही अनुभव हवाहवासा वाटतो. महागडी हॉटेल्स सामान्यांना परवडत नाहीत. सीझनमध्ये तर पर्यटनास जाणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाते. त्यासाठी 'होम स्टे' ही चांगली संकल्पना आहे.

स्थानिकांना रोजगार
आपल्या राहत्या घरातील, वापरात नसलेल्या खोल्यांचा उपयोग पर्यटकांसाठी केला जाऊ शकतो. त्यातून स्थानिकांना रोजगार तर पर्यटकांना स्थानिक खाद्यसंस्कृतीचा अनुभव मिळू शकतो. केरळ, उत्तराखंड, उत्तरांचल, कर्नाटक, राजस्थान अशा काही राज्यांमध्ये तसेच महाराष्ट्रातही कोकणात 'होम स्टे' ही संकल्पना मूळ धरत आहे. आता पिंपरी चिंचवड आणि मावळात ही संकल्पना रुजू पाहत आहे.

पंतप्रधानांकडूनही योजनेचे कौतुक
उत्तराखंड यात्रेसाठी येणार्‍या देश-विदेशातील पर्यटकांना अभूतपूर्व अनुभव मिळावा, यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय 'होम स्टे' योजना सुरू करण्यात आली. या योजनेमुळे स्थानिकांना रोजगार मिळाला. पर्यटकांचीही स्वस्तदरात राहण्याची व जेवणाची व्यवस्था होऊ लागली. पहाडी भागातील गावांचे स्थलांतर रोखले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या योजनेचे कौतुक केले. त्यामुळे हळूहळू ही संकल्पना जोर धरत आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ होम स्टे संकल्पना राबवणार्‍या खासगी व्यक्तींना प्रमाणपत्र देऊन त्यांची पर्यटन मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धी करणार आहे. त्यामुळे एकीकडे व्यवसायवृद्धी तर पर्यटकांना स्वस्तदरात जेवण व राहण्याची व्यवस्था उपलब्ध होणार आहे. होम स्टे संकल्पना राबविणार्‍या व्यक्तीला नोंदणीसाठी पाच वर्षांसाठी 5 हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे. एमटीडीसीचे प्रमाणपत्र मिळाल्याने त्यांना अधिकचा व्यवसाय उपलब्ध होणार आहे. कमर्शियलऐवजी रेसिडेन्शिअल दराने वीजआकारणी तसेच, कमर्शिअल गॅसऐवजी घरगुती गॅस या सुविधांचा लाभ मिळणार आहे.

मावळ व पिंपरी चिंचवडमध्ये रिसॉर्ट उभारणे, त्याची देखभाल करणे हे खर्चिक काम आहे. जाहिरातबाजी करून प्रतिसाद मिळेलच असे नाही. त्यामुळे छोट्या छोट्या पिकनिक स्पॉटवर अशी होम स्टे संकल्पना रोजगार निर्मितीसाठी उपयुक्त ठरत आहे. कामशेत, कार्ला, गिरीवनसारख्या ठिकाणांना मराठी तरुणांनी पसंती दिल्याचे दिसत आहे.

SCROLL FOR NEXT