कात्रज (पुणे); पुढारी वृत्तसेवा : कात्रज बाह्यवळण महामार्गावर सुरू असलेल्या सेवा रस्त्याच्या कामामुळे फाउंडेशन मोकळ्या झालेल्या धोकादायक होर्डिंगबाबत दै. 'पुढारी'ने नुकतेच वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत आकाशचिन्ह विभागाने हे होर्डिंग हटवले आहे, त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. कात्रज ते नवले पुलादरम्यान सहा पदरी रस्ता रुंदीकरणाचे काम अंतिम टप्यात आले असून सेवा रस्त्यांची कामेही सुरू आहेत.
या कामाची खोदाई करताना बाह्यवळण महामार्गावरील होर्डिंगचे फाउंडेशन मोकळे झाले होते. सध्या वादळी वार्यासह अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे धोकादायक असलेल्या या होर्डिंगवर तत्काळ काढण्याची मागणी करणारे वृत्त दै. 'पुढारी'ने गुरुवारी (दि. 11) प्रसिद्ध केली होती. याची दखल घेत गुरुवारी सकाळी धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय, आकाशचिन्ह विभागाने हे होर्डिंग हटविले आहे. यामुळे हे होर्डिंग कोसळण्याचा धोका टळल्याने नागरिकांनी दै. 'पुढारी'चे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे.