रावणगाव(ता. दौंड); पुढारी वृत्तसेवा : स्वामी चिंचोली येथे रविवारी (दि. 25) सकाळी रावणगाव मंडलाधिकारी मंगेश नेवसे व त्यांच्या सहकार्यांनी अवैध मुरूम वाहतूकप्रकरणी एक हायवा ट्रकवर कारवाई करीत ताब्यात घेतला. ही कारवाई स्वामी चिंचोली येथील तलाठी जयंत भोसले, नंदकुमार खरात, दीपक आजबे यांनी केली. एक हायवा (एमएच 17 बीवाय 6528) दोन दिवसांपासून चिंचोली हद्दीतून बेकायदेशीर मुरूम वाहतूक करीत होता. महसूल पथकाने हा हायवा ट्रक ताब्यात घेऊन दौंड येथील एसआरपीएफ गट नं. 7 येथे पुढील कारवाईसाठी लावल्याची माहिती त्यांनी दिली.
स्वामी चिंचोली या ठिकाणी सहा ते सात हायवा, दहा टायरगाड्या व पोकलेन मशिन गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बेकायदेशीर मुरूम वाहतूक करीत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. रविवारी (दि. 25) झालेली कारवाई ही फक्त नावापुरतीच झाली आहे का? बाकीच्या वाहनांवर कारवाई का झाली नाही? असे स्वामी चिंचोली परिसरात बोलले जाते. ही वाहने एका नामवंत कन्स्ट्रक्शन कंपनीची असल्याने बाकीच्या वाहनांवर कारवाई केली नाही का? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत तलाठी जयंत भोसले यांनी सांगितले की, या वाहनांवर कारवाई करीत असताना त्यांनी मुरूम उत्खननाची परवानगी असल्याचे सांगितले.