वनदेवी Pudhari
पुणे

नवरात्री 2024 : ऐतिहासिक देवस्थान वनदेवी

छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांनीही देवीचे दर्शन घेतले

पुढारी वृत्तसेवा

पुण्यातील महत्त्वाच्या देवस्थानांपैकी एक म्हणजे वनदेवी मंदिर. हे पुरातन काळातील मंदिर असून, नवरात्रोत्सवात शहरी ग्रामीण भागातील भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात आणि आयुष्यात सुख - समृद्धी नांदण्यासाठी देवीकडे प्रार्थना करतात, त्यांची ही कामना पूर्ण होते. छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांनीही देवीचे दर्शन घेतले होते, असे म्हटले जाते.

देवस्थानाला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. कर्वेनगर (पूर्वीचे हिंगणे) हे गाव मुठा नदीच्या काठी होते. गावापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायवाट होती. वनदेवी मंदिर परिसर तेव्हा जंगलमय होता. गावातील महिला- पुरुष वनदेवीच्या टेकडीवर गाई - म्हशी चरावयास आणि सरपण गोळा करण्यासाठी येत असत. पूर्वीपासून आठ- दहा मैलांवरून वनदेवीच्या दर्शनासाठी येत. नवरात्र आणि कोजागरी पौर्णिमेला मोठा उत्सव भरत असे. गावातील एक महिला गाई- म्हशी चरावयास आणि सरपण गोळा करण्यास वनदेवी परिसरात जात असे. या महिलेला घरी फार सासुरवास होत असे. एके दिवशी मंगळवारी ती महिला वनदेवी टेकडीवर आल्यानंतर घरातल्या त्रासामुळे ती रडत बसली. तिला सायंकाळ कधी झाली हे कळलेच नाही. दिवे लागणीच्या वेळी तिच्यासमोर प्रत्यक्ष देवी म्हणजेच वनदेवी प्रकट झाली. देवीने सर्व जाणून घेऊन त्या महिलेला रात्र झाल्याने घरी जाण्यास सांगितले. तेव्हा ती महिला म्हणाली, ‘मी आता घरी जाणार नाही. मला घरातील लोक त्रास देतील. काहीही संशय घेतील. देवी मी आता तुझ्याजवळच राहणार.’ त्या महिलेचा निश्चय पाहून वनदेवी म्हणाली, ‘हे सौभाग्यवती तू माझ्याजवळच थांब.’ असे म्हणून देवी आणि ती महिला तेथे अंतर्धान पावल्या. गावातील लोकांना असा दृष्टांत झाला. तेव्हा गावातील लोकांनी तेथे चौकशी केली असता त्यांना दोन पाषाणमूर्ती दिसल्या. मग सर्व गावकर्‍यांनी त्या मूर्तींची स्थापना केली. दगड - मातीचे लहान मंदिर बांधले. पहिले मंदिर दगड - मातीचे होते, नंतर सात जणांनी वनदेवी सेवा संस्था स्थापन करून मंदिराचा जीर्णोद्धार करून नवरात्र महोत्सव सुरू केला. दरवर्षी नवरात्रोत्सवात वैविध्यपूर्ण धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. याशिवाय दरवर्षी देवीची भव्य मिरवणूक निघते. ही पारंपरिक मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी असते. मिरवणूक उत्सवातील महत्त्वाचा भाग आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिरात वैविध्यपूर्ण धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. मंदिर दर्शनासाठी दिवसभर खुले राहणार आहे. उत्सव काळात भजन-कीर्तनासह देवीची महापूजा आणि होमहवन होणार आहेत. देवीची मिरवणूक निघणार आहे. यामध्ये घोडे, उंट, बँड पथक यांचा समावेश असणार आहे.
शिवाजी बराटे, अध्यक्ष, वनदेवी संस्था

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT