वडगाव शेरी : नगर रोड-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय, महापालिकेचे दवाखाने आणि राजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये हिरकणी कक्ष कार्यान्वित नाहीत, यामुळे स्तनदा मातांची गैरसोय होत आहे. यामुळे क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणार्या सर्व आस्थापनांमध्ये हिरकणी कक्ष तातडीने सुरू करण्याची मागणी मातोश्री सेवा ट्रस्टेचे अध्यक्ष दत्तात्रय सोंडेकर यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
राज्य सरकारने सरकारी-निमसरकारी कार्यालये, खासगी आस्थापना, संघटित क्षेत्र आणि सार्वजनिक ठिकाणी मातांना आपल्या बाळांना स्तनपान करता येण्यासाठी हिरकणी कक्ष सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र, नगर रोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयात अद्यापही हिरकणी कक्ष नाही. राजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्येदेखील ही सुविधा उपलब्ध नाही. तसेच महापालिकेच्या मीनाताई ठाकरे क्लिनिक आणि दामोदर रावजी गलांडे दवाखान्यांमध्ये देखील हिरकणी कक्ष नाही. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे स्तनदा माताची गैरसोय होत असल्याचेही सोंडेकर यांनी सांगितले.