पुणे

हिंजवडी झाले डेंग्यू रुग्णांचे ‘हब’

अमृता चौगुले

हिंजवडी : मारुंजी-हिंजवडी परिसरात मागील महिनाभरात 57 जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. परिसरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे दिसत आहे. तर, यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

खासगी रुग्णालयात अनेकांनी घेतले उपचार
यातील अनेक रुग्णांनी खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मागील आठवड्याभरात यावर नियंत्रण आणण्यात आरोग्य प्रशासनाला यश आले आहे. मागील महिन्यात मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. हिंजवडीत चार मोठ्या रुग्णालयांत सातजण उपचार घेत होते. महिन्यात 57 जणांना डेंग्यू झाल्याचे उघड झाले. यातील अनेकांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे.

आरोग्य स्थिती हाताबाहेर
ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा सक्षम ठेवण्याची जबाबदारी जिल्हा परिषदची आहे. मात्र, निवडणूक लांबल्याने नेत्यांच्या हातचा कारभार एकहाती जिल्हा परिषद प्रशासनाच्या हातात आहे. मात्र, अभियान काळ सरताच प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत राबवली जाणारी यंत्रणा सैल झाली असून, आरोग्य स्थिती हाताबाहेर जात आहे. परिणामी, झेडपीचे प्रशासन कुचकामी ठरत असल्याचा अनुभव येत आहे.

आरोग्य विभाग औषध फवारणी करून वेळोवेळी खबरदारी घेतच आहे. रुग्ण आढळलेल्या गावांमध्ये तात्काळ उपाययोजना केल्या जातील. संबंधित ग्रामपंचायतींना खबरदारी घेण्यासाठी प्रयत्न करावेत.
                        – मायादेवी गुजर, आरोग्य अधिकारी, माण प्राथमिक केंद्र

हिंजवडी परिसरात रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी वेळोवेळी औषध फवारणी करण्यात येत आहे. त्यामुळे डेंग्यू आटोक्यात येत आहे.
                                          – तुळशीराम रायकर, ग्रामसेवक, हिंजवडी

आयटी हब डेंग्यू पैदास केंद्र का झाले
परिसरात टोलेजंग इमारतीचे गृहप्रकल्प सुरू आहेत. बांधकाम सुरू असताना पाया खोदलेल्या जागी लाखो लिटर पाणी साठून राहते. अनेक ठिकाणी अर्धवट तळघरात स्वच्छ पाणी साठून आहे. आयटी पार्क टप्पा एकच्या बाजूला सुरू गृहप्रकल्प, टँकरने पाणी पुरवण्यासाठी बनवलेल्या कृत्रिम टाक्या आहेत. तसेच, रस्त्यालगत फेकलेल्या शेकडो ओल्या नारळात पावसाचे स्वच्छ पाणी साठून असते.

बांधकामाच्या पाण्याचा निचराच नाही
मारुंजीत सिमेंट रस्त्याखाली सिमेंट पाइपच्या मोरी टाकल्या नाहीत. अनेकांनी खड्ड्यात मुरुम भराव टाकून बांधकामे केल्याने पाण्याचा निचराच होत नाही. पाण्याची डबकी गावभर घोंगावणार्‍या डासांचे अड्डे झालेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT