पुणे

Hinjawadi News : चाकणनंतर आता ‘आयटी हब’ हिंजवडीत असंतोषाचा भडका; मूलभूत सुविधांसाठी ६ सप्टेंबरला रस्त्यावर उतरणार

खड्डे, वाहतूककोंडी आणि निकृष्ट रस्त्यांमुळे आयटीयन्स संतप्त; हिंजवडीत स्वतंत्र महापालिकेसह विविध मागण्यांसाठी एल्गार

पुढारी वृत्तसेवा

पुणे : चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. मात्र, गेल्या वर्षभरापासून हिंजवडी- माण- मारुंजीतील आयटी क्षेत्रात, परिसरातील रस्ते, वाहतूक, नागरी समस्या अद्याप प्रतीक्षेत असून, अद्याप कुठलीच कार्यवाही झाली नसल्याचा आरोप मंगळवारी आयटी कंपन्या, कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.

दरम्यान, विविध संघटनांच्या वतीने प्रलंबीत मागण्यांसंदर्भात सरकारचे लक्ष वेधावे म्हणून ६ सप्टेंबर रोजी हिंजवडी मुख्य चौक ते शिवाजी चौकात सकाळी १० वाजता आंदोलन करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

'फोरम फॉर आयटी एम्प्लॉइज महाराष्ट्र'चे पवनजित माने, हिंजवडी इंडस्ट्रीयल असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी कर्नल (निवृत्त) शंकर साळेकर, हिंजवडी एम्प्लॉईज अँड रेसिडंट्स ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेंद्र हुलसुरे, हिंजवडी फेज दोन परिसरातील रहिवासी प्रशांत भोपळे, राधिका जोगे, नम्रता नाईक आदी उपस्थित होते.

हिंजवडी आयटी क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने दूरदूरवरून येथे कर्मचारी येत असतात. मात्र, या परिसरात येणारे रस्ते अत्यंत खराब आणि निकृष्ट असल्याने समस्या वाढल्या आहेत. याचा कामावर, आरोग्यावर परिणाम होत असून, अपघात, वाहतूककोंडी, प्रदूषण यांसारख्या समस्या वाढल्या आहेत. औद्योगिक मंत्री चाकणमध्ये अडचणी येताच तातडीने येऊन जातात. इतर मंत्र्यांची कार्यवाही सुरू होते. मात्र, गेल्या एक ते दीड वर्षापासून हिंजवडी, माण, मारुंजी परिसरात पायाभूत सुविधांपासून नागरिक, कर्मचारी त्रस्त असताना याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत मंत्रालयीन स्तरावर वारंवार पाठपुरावा करून कुठलाच प्रतिसाद दिला जात नाही. केवळ मापक मिळाव्या एवढीच आमची मापक अपेक्षा आहे, असे माने यांनी सांगितले.

तसेच, या परिसरातील अरुंद रस्ते तातडीने दुरुस्त करावे. येथील खड्डे, कोंडी ही दैनंदिन समस्या सुटलेली नाही. आणखी किती काळ पायाभूत सुविधांसाठी वाट पाहायची? अपघात होऊ शकतात, लहान मुलांसाठी रस्ते धोकादायक झाले आहे, अशी खंत हिंजवडीतील रहिवासी प्रशांत भोपळे यांनी व्यक्त केली. तसेच, रस्ते रुंदीकरण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, मेट्रो तातडीने सुरू करून वाकड- बालेवाडी ट्रान्झिट हब विकसित करावे, अशी मागणी करण्यात आली.

विकास झाला; मात्र रस्ते, पाणी आणि वाहतूक या मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागत आहे, असे राधिका जोगे यांनी सांगितले. खड्डे, अपघात आणि कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नांकडेही शासनाने गांभीर्याने पाहावे, अशी मागणी नम्रता नाईक यांनी केली. तर, या ठिकाणच्या पायाभूत आणि मूलभूत सुविधांबाबत तातडीने आराखडा तयार करावा, असेही सूचित करण्यात आले.

आंदोलनातील सहभागी

स्थानिक शेतकरी, रहिवासी, आयटी कर्मचारी, रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन, माण-हिंजवडी-मारुंजी इन्फ्रा फोरम, एफआयटीई, पिंपरी-चिंचवड को-ऑप. हौसिंग फेडरेशन, मुळशी हौसिंग को-ऑप. हौसिंग फेडरेशन आणि इतर स्थानिक संघटना.

प्रमुख मागण्या

- प्रस्तावित भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन रस्ते रुंदीकरण करावे.

- माण ते शिवाजीनगर मेट्रो तातडीने सुरू करावी.

- पुढील १८० दिवसांत हिंजवडी स्वतंत्र महापालिका स्थापना करावी.

- दर महिन्याला जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन समस्यांबाबत कार्यवाही करावी.

- वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या.

- पाण्याचा स्त्रोत निश्चित करावा, नवीन बांधकामाच्या परवानग्यांवर निर्बंध ठेवावेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT