पुणे

मंचर : बैलाला दिला हिंद केसरीचा मान

अमृता चौगुले

मंचर(ता.आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : बैलगाडा शर्यतीची शान 'बबड्या' नावाच्या 17 वर्षे वयाच्या बैलाचा सन्मान नांदूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सह्याद्री केसरी यात्रोत्सवात त्याला 'हिंद केसरी' किताब देण्यात आला. ट्रॉफी व हार अर्पण करून हा किताब आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंकित जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत रामकृष्ण टाकळकर व प्रकाश कबाडी यांच्या हस्ते देण्यात आला. बैलाची घाटातून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली.

बबड्याची गोष्टच निराळी आहे. मालक अंकुश एलभर यांनी 2005 साली त्यास पिंपळगाव येथून एका मित्राकडून खरेदी केले होते. बैल न समजता घरचा सदस्यच होता. त्याचा आहार हा सर्वोत्तम पद्धतीचा होता. त्यामुळे बैल आजही धष्टपुष्ट, देखणा व सतेज आहे. बैलाचे आयुष्यमान जास्तीत जास्त 20-22 वर्षांपर्यंत असते. पण, बबड्याने आज आयुष्यमान पार केल्याने त्याचे बैलगाडा प्रेमींमध्ये कौतुक होत आहे.

बबड्याने अनेक बैलगाडा शैर्यतीत घाटाचा राजा म्हणून बहुमान मिळवला आहे. अनेकदा अंतिम फेरीत फायनल सम्राट म्हणून नाव कमावले आहे. यात्रेतील बबड्या बारी पुकारल्यावर बैलगाडाप्रेमी आवर्जून ती बारी पाहण्यास गर्दी करीत असे. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नावारूपाला आलेल्या बैलगाडा बारीत त्याचा विशेष सहभाग नेहमी असायचा. बबड्याच्या देखभालीत कमलेश वळसे पाटील, राहुल वळसे पाटील, सागर साळुंके, अमर थोरात, शाम वळसे पाटील आणि दिलीप वळसे पाटील बैलगाडा मित्रमंडळाचा मोलाचा सहभाग आहे.

बैलाला सांभाळून त्याच्यावर प्रेम करणारी शेतकरी कुटुंब आहेत. त्यामुळे बैल आणि शेतकरी हे अतूट नाते बनले आहे. बबड्याने बैलगाडा घाटात अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. त्यामुळे कर्तव्य भावनेने केलेला सत्कार अनमोल आहे.

                                  – जयसिंग एरंडे, अध्यक्ष, जिल्हा बैलगाडा मालक संघटना.

SCROLL FOR NEXT