पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने 2 हजार 72 प्राध्यापकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची कार्यवाही सुरू केली असून, यामध्ये कोणत्याही स्तरावर गैरप्रकार होत असल्यास माझ्याकडे तक्रार करावी, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संघटनांना केले आहे. प्राध्यापकांच्या कार्यभारावर (वर्कलोड) आणि तासिका तत्त्वावर काम करणार्या प्राध्यापकांच्या मागण्यांवर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले. प्राध्यापकांच्या विविध मागण्यांसदर्भात पाटील यांनी नेट-सेट, पीएचडीधारक संघर्ष समिती आणि नवमहाराष्ट्र प्राध्यापक संघटनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली आणि मागण्यांचे निवेदन स्वीकारले, या वेळी ते बोलत होते.
केद्र सरकार व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) आदेशानुसार 100 टक्के प्राध्यापक भरती करणे, तासिका तत्व धोरण बंद करून 'समान काम समान वेतन' लागू करणे आणि प्राध्यापक भरती गतिमान करून वेळेत पूर्ण करणे, आकृती बंध नव्याने करणे अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे विद्यापीठातील कर्मचार्यांच्या शिष्ट मंडळाने प्रलंबित प्रश्नांबाबत पाटील यांना निवेदन दिले. पाटील म्हणाले, 'प्राध्यापक भरतीला मान्यता दिली असून, त्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेत कोणी आर्थिक गैरव्यवहार करीत असल्यास, त्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे करण्यात यावी, याची दखल घेण्यात येईल. त्याचप्रमाणे आकृती बंधाला पाच वर्षांहून अधिक कालावधी झाल्याने, रिक्त पदांचा आढावा घेण्यात येईल.
महाविद्यालयांमध्ये प्राचार्य पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, एखाद्या ठिकाणी अडचण असू शकते. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे वेतन दिवाळीपूर्वी करण्याच्या सूचना नुकत्याच दिल्या आहेत. त्यात वाढ करण्यासोबतच प्राध्यापकांच्या वर्कलोडमधील त्रुटी सोडवण्यासाठी येत्या काळात बैठक बोलावून चर्चा करण्यात येईल.' डिसेंबर महिन्यापर्यंत प्राध्यापकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन पाटील यांनी दिले.