पुणे

ए, चल दारु आण! वयाचे बंधन झुगारून अनेक ठिकाणी मद्यविक्री

Laxman Dhenge
प्रसाद जगताप/ नरेंद्र साठे
पुणे : वयाचे बंधन झुगारून काही मद्यविक्रेत्यांकडून अल्पवयीन मुलांना मद्यविक्री केली जात आहे, तर काही ठिकाणी विक्रेते नकार देत असल्याने अल्पवयीन मुलांकडून शक्कल लढवत सज्ञान मद्यपींची मदत घेऊन दारू मिळवत असल्याचा प्रकार दै. 'पुढारी'च्या पाहणीत समोर आला आहे. दारूच्या दुकानांसमोर अटी व नियमांचे फलक दर्शनी भागात लावले आहेत. तसेच,  ड्रिंक खरेदीसाठी 25  वर्षे वयाची अट आहे. असे असतानाही अल्पवयीन दिवट्यांपर्यंत दारू नेमकी पोहोचते कशी? हा मुद्दा कल्याणीनगर येथील
 ड्रंक अँड ड्राइव्ह घटनेनंतर ऐरणीवर आला.
याबाबत दै. पुढारीच्या प्रतिनिधींनी शनिवारी रात्री शहरातील दारूंच्या काही दुकांनाची पाहणी केली. त्यावेळी अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलांकडून दारू खरेदीसाठी 25 पेक्षा अधिक वय असलेल्यांची मदत घेतली जात असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी तर एखाद्या बेवड्याला किंवा मित्राला पैशाचे आमिष दाखवले जाते… अन्  'ए, चल दारू आण!'ची सूचना केली जाते.  अल्पवयीन मुलांना दारू विक्री न करणे, असा नियम आहे. परंतु, शहरातील काही दारूच्या दुकानांवर सर्रासपणे अल्पवयीनांना दारू विक्री होत असल्याचे समोर आले आहे.  कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघाताच्या घटनेनंतर प्रशासन अलर्ट झाले असल्याने दारू विक्री करणार्‍या दुकानदारांनीही सावध पवित्रा घेतल्याचे दिसून आले.  दारूच्या दुकानांवर '25 वर्षांखालील तरुणाला दारू मिळणार नाही' असे फलक लागल्याचे पाहणीत दिसले. यावरून दारू विक्री करणार्‍या दुकानदारांकडून अल्पवयीन मुलांना दारू विक्री केली जात नाही, मग अल्पवयीन मुलांना पिण्यासाठी दारू कशी उपलब्ध होते, असा सवाल उपस्थित होत आहे.   बेकायदा दारू विक्री रोखण्यासाठी आता प्रशासन पातळीवर ठोस उपाययोजना करणे गरजेचे  आहे.

मोठ्या मित्रांची घेतली जात होती मदत

दै. 'पुढारी'च्या प्रतिनिधींनी धनकवडीसह शहरातील बहुतांश भागात शनिवारी पाहणी केली. त्यावेळी नेहमीप्रमाणे असलेली दारू पिणार्‍यांची गर्दी पाहायला मिळाली. दारूच्या दुकानांबाहेर '25 वर्षांखालील व्यक्तीला दारू मिळणार नाही,' अशी सूचना असलेले फलक पाहायला मिळाले. मात्र, तरीही काही अल्पवयीन मुले दुकानांपासून काही अंतर लांब उभी राहून, आपल्यापेक्षा वयाने
मोठ्या असलेल्या मित्रांना दारू खरेदीसाठी पाठवत असल्याचे पाहायला मिळाले.

सिंहगड रस्त्यावर अल्पवयीनांची गर्दी

वेळ रात्री आठनंतरची… एका चौकात डाव्या बाजूला तरुणांची गर्दी झालेली… शेजारी छोट्या हातगाड्यांवर शेंगदाणे, कैरी, डाळींची विक्री करणार्‍या महिला… शनिवार असल्याने दारू खरेदीसाठी गर्दी होती… पण यात अल्पवयीन आढळले नाहीत…

 दांडेकर पुलावर सायंकाळी होते गर्दी

दरम्यान, शनिवारी संध्याकाळी दांडेकर पूल परिसरातील वाईन विक्रीच्या दुकानासमोर मोठी गर्दी होती, अल्पवयीन मुलांकडून दारू खरेदी करत असल्याचे पाहण्यात आले नाही. अशीच परिस्थिती शहरातील हिराबाग चौक, महापालिका चौकात, दत्तवाडी, फर्ग्युसन रस्त्यावरील गोखल चौकात, राजेंद्रनगर तसेच सिंहगड रस्त्यावरील वाईनच्या दुकानांच्या बाहेर बघण्यास मिळाली.

वयाचा लावला जातो अंदाज

मद्यविक्री करताना प्रत्येकाचे वय बघण्यास  कर्मचार्‍यालाही वेळ नसतो. कारण, त्याच्याकडे संध्याकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. परंतु, ते अंदाजानेच एखाद्या अल्पवयीन मुलाला बाहेर काढतात, असे एका कर्मचार्‍याने दैनिक 'पुढारी'च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

अनेक ठिकाणी दिवसाही नशा

कल्याणीनगरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर दारू विक्रेते अलर्ट मोडवर असल्याचे दिसून आले. त्यामध्ये काही दुकानांमध्ये अल्पवयीन मुलांना मद्यविक्री करत नसल्याचा फलकदेखील आढळून आला. मात्र, दुसरी बाजू अशी सज्ञान व्यक्तींकडून खरेदी केली जात असलेली दारू ही अल्पवयीनांच्या हाती लागत नसेलच हे सांगता येत नाही. कारण, शहरातील अशा काही ठिकाणी भरदिवसादेखील अल्पवयीन मुले नशा करताना आढळून येतात. या मुलांकडे येणारी दारू ही त्यांच्यापैकी मोठ्या असलेल्या मुलाकडून दुकानातून खरेदी केली जाते. त्यानंतर अल्पवयीन मुलांना ती सहज उपलब्ध होत असल्याची शक्यतादेखील आहे.

दारू पिण्यासाठीचा परवाना सक्तीचा करा

परदेशात दारू पिण्यासाठी पिणार्‍यांना आधारकार्ड प्रमाणेच स्मार्ट कार्डचा परवाना दिला जातो. त्यावरूनच संबंधित व्यक्तीचे वय दुकानदारांच्या लक्षात येते अन् तेथील शासनाच्या रेकॉर्डवरदेखील अल्कोहोल सेवनाची नोंद राहते. त्यासोबतच ज्या व्यक्तीकडे दारू सेवन करण्याचा परवाना नसतो. त्याला दुकानदाराकडून दारू विक्री केली जात नाही. जर कोणत्या दुकानदाराने असे केले तर त्यावर दंडासह तुरुंगवासाची शिक्षा परदेशातील दारू विक्रेत्यांना केली जाते. असे नियम भारतातील दारू विक्रेत्यांना लावून अल्कोहोलिक व्यक्तींसाठी परवाना सक्तीचा करावा, अशी मागणी पुणेकरांकडून होत आहे.

व्यसनाधिन मुलांमुळे कुटुंबे उद्ध्वस्त होतात

व्यसनाधिन मुलांच्या संगतीला लागून शाळेत हुशार आणि चांगले गुण मिळवणारी मुले वाईट मार्गाला लागल्याच्या घटनादेखील पुण्यात घडत आहेत. ही हुशार मुले अशा मुलांच्या नादी लागून अल्पवयातच दारू, तंबाखू, गुटखा यासारख्या व्यसनांना बळी पडत आहेत. त्यातच यांच्याकडून 'भाईगिरी' करण्यास सुरुवात होत असून, शहरात कोयता गँगसारख्या अल्पवयीनांच्याच गँग तयार व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अल्पवयीन भाईंना रोखण्यासाठी प्रशासनाने मुळावरच घाव घातला पाहिजे, म्हणजेच दारू, गुटखा, मावा, तंबाखू विक्रेत्यांवर कडक कारवाई करून अल्कोहोल परवान्याची आधारकार्डप्रमाणे सक्ती करणे, आता गरजेचे बनले आहे. व्यसनाधिनतेमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांचे भविष्य टांगणीला लागलेले आहे.
 दारू पिण्यामुळे अल्पवयीनच काय पण तरुण आणि ज्येष्ठांच्या आयुर्मानावर मोठा परिणाम होत आहे. त्यांचे आयुर्मान कमी होऊन शारीरिक आणि मानसिक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागले. दारू पिणार्‍यांचे मन कायमच गोंधळलेले असते. मानसिक त्रास कमी व्हावा, यासाठी अनेकजण दारू पिण्यावर भर देतात. मात्र, यामुळे आणखी कुटुंबीय आर्थिक समस्या समोर येतात. त्यामुळे मानसिक त्रास कमी करण्यासाठी दारूचा वापर न करता, त्याला स्थैर्याने सामोरे गेले पाहिजे. आलेल्या परिस्थितीशी दोन हात केले पाहिजे. तसेच, प्रशासनासह वडीलधार्‍यांनी अल्पवयीनांना दारूपासून रोखण्यासाठी कठोर पावले उचलली गेली पाहिजेत. तरुणाई सुधारली तरच आपल्या देशाचा विकास होणार आहे.
– सुप्रिया साबळे, मानसोपचारतज्ज्ञ
दुकानांच्या दर्शनी भागातील अटी, नियमांचे फलक केवळ नावालाच
प्रशासनाने ठोस
कारवाई करावी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT