औषधांचा तुटवडा; हिमोफिलिया रुग्णांची ससेहोलपट file photo
पुणे

Hemophilia Medicine Shortage: औषधांचा तुटवडा; हिमोफिलिया रुग्णांची ससेहोलपट

ससूनमधील केंद्र बंद; जिल्हा रुग्णालयात शासनाकडून अपुरा पुरवठा

पुढारी वृत्तसेवा

Hemophilia patients suffer due to shortage of medicines

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे: हिमोफिलिया या रक्ताशी संबंधित दुर्मीळ आजारासाठी ससून रुग्णालयात हिमोफिलिया केंद्र सुरू करण्यात आले. शासनाकडून औषधांसाठी पुरेसा निधी देण्यात आला नाही. कालांतराने हिमोफिलिया केंद्र औंध जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, जिल्हा रुग्णालयातही हिमोफिलियावरील औषधांचा तुटवडा आहे. उपचार महागडे असल्याने आणि औषधे मिळत नसल्याने रुग्णांची ससेहोलपट होत आहे.

हिमोफिलिया हा रक्त गोठण्याशी संबंधित गंभीर आजार असून रुग्णाला आयुष्यभर औषधोपचार घ्यावे लागतात. जखम झाल्यास किंवा शस्त्रक्रिया करावी लागल्यास रुग्णाचे रक्त थांबण्यास वेळ लागतो आणि जीव धोक्यात येऊ शकतो. (Latest Pune News)

त्यामुळे वेळेवर औषध उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक असते. मात्र सध्या जिल्हा रुग्णालयात फॅक्टर 8 आणि फॅक्टर 9 या महत्त्वाच्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांनी आरोग्य विभागाला पत्र लिहिले आहे.

राज्य शासनाने काही वर्षांपूर्वी ससून रुग्णालयात हिमोफिलिया केंद्र सुरू केले होते. मात्र, पुरेशी औषधे उपलब्ध होत नसल्याने ससून रुग्णालय प्रशासनाकडून शासनाशी पत्रव्यवहार करण्यात आला. त्यावेळी औंध जिल्हा रुग्णालयात केंद्र सुरू करण्यात असल्याचे शासनाकडून कळवण्यात आले. औंध येथील जिल्हा रुग्णालयात सध्या हिमोफिलियाच्या 150 रुग्णांची नोंद असून त्यांना नियमित औषधोपचाराची गरज भासते.

हिमोफिलिया रुग्णांसाठी लागणारी औषधे व त्यांचा खर्च

  • फॅक्टर 8 इंजेक्शन - रक्त गोठण्यासाठी आवश्यक, एका डोसची किंमत साधारण

  • 2,000 - 3,500 रुपये.

  • फॅक्टर 9 इंजेक्शन - गंभीर रुग्णांसाठी, एका डोसची किंमत 3,500 - 5,000 रुपये.

  • अँटी हिमोफिलिक फॅक्टर - शस्त्रक्रिया किंवा मोठ्या जखमेवेळी दिले जाते, किंमत डोसप्रमाणे बदलते.

  • एका रुग्णाला महिन्याला सरासरी 4 ते 6 डोस आवश्यक - खर्च 10,000 ते 20,000 रुपये

आकडेवारी काय सांगते?

  • हिमोफिलिया आजाराचे पुणे जिल्ह्यामध्ये 800 रुग्ण आहेत.

  • त्यातील 150 जिल्हा रुग्णालयात नोंदणीकृत.

  • यापैकी 125 रुग्णांना फॅक्टर 8 ची गरज, उर्वरित रुग्णांना फॅक्टर 9 ची गरज.

  • जिल्हा रुग्णालयाला मार्चनंतर फॅक्टर 8 चे 1000 डोस मिळाले आणि फॅक्टर 9 चे 350 डोस मिळाले.

  • यापूर्वी आरोग्य विभागाकडून फॅक्टर 8 च्या खरेदीसाठी निधी मिळाला होता. पुढील निधीबाबत आरोग्य विभागाकडून काही कळवण्यात आले नाही.

ससूनमध्ये हिमोफिलिया केंद्र सुरू करण्यात आले. कालांतराने केंद्र औंध जिल्हा रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले. औंध जिल्हा रुग्णालयातून काही रुग्णांना उपचारांसाठी ससून रुग्णालयात पाठवले जाते. मात्र, ससूनमधील केंद्र बंद झाले आहे आणि औषधेही उपलब्ध नाहीत.
- डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून सर्वोपचार रुग्णालय
हिमोफिलिया आजारावरील औषधांचा औंध जिल्हा रुग्णालयात काही प्रमाणात तुटवडा आहे. याबाबत आरोग्य विभागाला पत्र लिहून निधी मंजूर करण्याची मागणी केली आहे. निधी उपलब्ध झाल्यावर औषधांचा पुरवठा पुन्हा सुरळीत होईल.
- डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, औंध जिल्हा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT