पुणे: सध्या शहर व परिसरामध्ये गुलेन बॅरी सिंड्रोम या आजारामुळे रुग्णालयात दाखल होणार्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांच्या उपचारांसाठी लाखो रुपयांचा खर्च होत आहे. जीबीएसच्या रुग्णांना महापालिकेकडून एक लाख रुपयांची मदत केली जाणार असल्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी घेतला आहे. याबाबत खासगी रुग्णालयांना पत्र पाठवण्यात आले आहे.
नांदेड सिटी, नांदेड गाव, किरकटवाडी, डी.एस.के विश्व, धायरी या भागात वास्तव्यास असलेल्या आणि शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेचे सभासद असलेल्या रुग्णांना 1 लाख रुपयांपर्यंत मदत केली जाणार आहे. अतिदक्षता विभाग व व्हेंटिलेटरवर उपचार घेणार्या रुग्णांना दोन लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत करण्यात येईल.
शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेचे सभासद नसलेल्या, परंतु वर नमूद केलेल्या भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांपैकी जीबीएस आजारामाठी अतिदक्षता विभाग व व्हेंटिलेटरवर उपचार घेणार्या रूग्णांना 1 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे या आजाराच्या रुग्णांबाबत संबंधित रुग्णालयाने त्वरित माहिती कळविणे बंधनकारक राहिल. महापालिकेमार्फत रूग्णांच्या वैद्यकीय प्रतिपुर्तीच्या बिलांचे ऑडिट करण्यात येईल. संबंधित रुग्णाची संपूर्ण केस फाईल व इतर सर्व कागदपत्रांची पुर्तता करून रुग्णांची बिले रूग्ण डिस्चार्ज झाल्यानंतर आरोग्य विभागाकडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आरोग्य विभागाकडे दाखल केलेल्या बिलांची छाननी व तपासणी करून आर्थिक मदतीची रक्कम संबधित रूग्णालयास अदा करण्यात येईल, असे रुग्णालयांना पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
कोणती कागदपत्रे आवश्यक?
पुणे मनपा हद्दीतील रेशनिंग कार्ड व आधार कार्डची छायांकित प्रत.
शहरी गरीब योजनेचा सभासद असल्यास कार्डच्या दोन्ही बाजूची छायांकित प्रत.