राज्यात तयार झालेल्या प्रचंड उकाड्यामुळे संथ झालेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. 22 ऑगस्टपर्यंत बहुतांश भागांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात थांबलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे.
गेले पाच दिवस राज्यात मान्सून थांबला होता. कमाल तापमानात तब्बल 8 ते 10 अंशांनी वाढ झाल्याने ऑगस्टमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ जाणवू लागली होती. त्यामुळे या उकाड्यातून तयार झालेल्या उष्णता संवाही या प्रक्रियेमुळे हवेचे दाब कमी झाले आणि पुन्हा संथ झालेला मान्सून सक्रिय झाला. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागांत 17 ऑगस्टपासून पावसाला सुरुवात झाली. रविवारी (दि. 18) राज्यातील बहुतांश भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. पुण्यात सायंकाळी 5 नंतर जोरदार पाऊस झाला.
राज्यावर हवेचे दाब गेले काही दिवस 1006 हेक्टा पास्कल इतके होते. ते आता 1005 ते 1004 इतके होण्यास सुरुवात होताच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र हे दाब सध्या मराठवाड्यात अनुकूल नाहीत. त्यामुळे त्या भागात तुलनेत कमी पाऊस आहे. राज्यात उकाडा आणि मुसळधार पाऊस 22 ते 25 ऑगस्टपर्यंत राहील, असाही अंदाज हवामानतज्ज्ञांनी दिला आहे.
पालघर (19, 20), ठाणे (20, 21), मुंबई (21), रायगड (19 ते 22), रत्नागिरी (19 ते 21), सिंधुदुर्ग (19, 20), धुळे (19 ते 21), नंदुरबार (19, 20), जळगाव (19 ते 21), नाशिक (19 ते 22), कोल्हापूर (19 ते 22), पुणे (19 ते 22), सातारा (19 ते 21), सांगली (19 ते 21), सोलापूर (19 ते 21), छत्रपती संभाजीनगर (19, 20), जालना (19), परभणी (19), हिंगोली (19), बीड (19, 20), नांदेड (19), धाराशिव (19 ते 21), अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा (19 ते 22), गडचिरोली, नागपूर (19, 21), गोंंदिया (19, 20), वाशिम, यवतमाळ (19 ते 22).
ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, अरबी समुद्रावरून वाहणार्या हंगामी पश्चिमी वार्यांची दिशा सध्या बदलली आहे. महाराष्ट्रावर सध्या हे वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतेय. म्हणजेच बाष्पयुक्त अरबी समुद्री वारे येणे थांबले. हवेच्या दाबातील फरक नामशेष झाला असून सध्या तो एकसमान म्हणजे 1006 मिलिबार (हेक्टा पास्कल) आहे. त्यामुळेच वार्याचा वेग मंदावला होता. हवेला वहन नसल्यामुळे रात्री जमिनीतून बाहेर येणार्या उष्णतेलाही सध्या अटकाव होत आहे. पर्यायाने संचित झालेली ही उष्णता काहिलीला मदत करीत आहे. एकत्रित परिणामातून उष्णता वाढल्याने महाराष्ट्रात उकाडा जाणवत आहे.