Mulshi Rain
पौड : मुळशी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊसामुळे तालुक्यातील महत्त्वाची दोन्ही मोठी धरणे मुळशी आणि टेमघर ९५ टक्क्यांपेक्षा जास्त भरली असून मुळशी धरणातून १९ हजार ६०० क्युसेक तर टेमघर धरणातून ३०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
मुळशी तालुक्यातून मागील १० ते १५ दिवसांपासून पाऊस गायब झाला होता. यामुळे भातशेती कोरडी पडण्याच्या मार्गावर होती. आता सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे भातरोपांना जीवदान मिळाले असून शेतकरी वर्गात आनंद पसरला आहे. मुळशी तालुक्याच्या सर्व भागात मुसळधार पाऊस पडत असून नदी, ओढे-नाले भरून वाहत असून सर्वच रस्त्यावर पाणी वाहत आहे.
ताम्हिणी येथे २४ तासांत तब्बल ३२० मिलीमीटर पाऊस झाला आहे. या हंगामात आत्तापर्यंत ६ हजार ८५३ मिलीमीटर एवढा मोठा पाऊस झाला आहे. मुळशी धरण ९६.५० टक्के भरले आहे, तर टेमघर धरण ९७.४० टक्के भरले आहे. धरणातील पाणीसाठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विसर्ग वाढवत टेमघर धरणातून मुठा नदीत ३०० क्युसेक तर मुळशी धरणातून मुळा नदीत १९ हजार ६०० क्युसेक वेगाने नियंत्रीत विसर्ग करण्यात येत आहे.
आपत्कालीन स्थितीसाठी संपर्क क्रमांक जाहीर
मुळशी तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. मुळशी धरण आणि टेमघर धरण १०० टक्के भरण्याच्या मार्गावर असून या धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यात वाढ करण्यात येईल. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे. आपत्तीच्या वेळी पौड तहसिलदार कार्यालय (०२०/२२९४३१२१), पौड पोलिस ठाणे (७५२२९९०१००) तसेच मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती (प्रमोद बलकवडे - ८३९०३३६६८८) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन मुळशीचे तहसिलदार विजयकुमार चोबे यांनी केले आहे.