पुणे: कोकणसह मध्य महाराष्ट्राला शुक्रवारी (दि. 20 ) अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून हवेचा दाब वाढल्याने शनिवारपासून विदर्भ वगळता इतर भागातील मोठा पाऊस कमी होत आहे. राज्यात 25 जूनपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान गत 24 तासांत घाट माथ्यावर विक्रमी पाऊस झाला आहे.
मान्सूनची प्रगती वेगात सुरू असून गुरुवारी राजस्थानमध्ये प्रवेश केल्याने आता देशाचा 75 टक्के भाग व्यापला आहे. दरम्यान, राज्यात हवेचे दाब हे 998 वरून 1010 हेक्टा पास्कल इतके झाले आहेत. त्यामुळे मान्सूनचा जोर कमी होत आहे. विदर्भ वगळता कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील पाऊस कमी होत आहे. (Latest Pune News)
राज्यात 25 जूनपर्यंत हलका पाऊस
राज्यातील बहुतांश भागातून मोठा पाऊस 21 जूनपासून कमी होत आहे. तसेच सर्वत्र हलका पाऊस 25 जून पर्यंत राहील. विदर्भात 25 जूनपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे.
आगामी पाच दिवसांतील अलर्ट (कंसात जूनमधील तारखा)
ऑरेंज अलर्ट: पुणे घाटमाथा (20 व 22), कोल्हापूर घाटमाथा (20 ते 23).
यलो अलर्ट: पुणे घाट (21, 23), कोल्हापूर घाट (21, 22), पालघर (20 ते 23), ठाणे (20 ते 23), मुंबई (22, 23), रायगड (21 ते 23), रत्नागिरी (20 ते 23), सिंधुदुर्ग (20 ते 23), सातारा (20 ते 23), जालना 20, परभणी (20), हिंगोली (20), नांदेड (20), विदर्भ: अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर ,बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ (20 ते 25).