पौड, पुढारी वृत्तसेवा: मुळशी तालुक्यात दुपारी तीननंतर विजेच्या गडगडाटासह परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे कामगार, विद्यार्थी, व्यावसायिक यांची चांगलीच तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. जोरदार पावसामुळे हाताशी आलेले भात पिकाचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुळशी तालुक्यात दुपारी तीन वाजता पिरंगुट परिसरात पावसाला सुरुवात झाली. यानंतर सुतारवाडी, पौड परिसरात सायंकाळी विजांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रावडे येथे एका घरावर वीज पडून 50 पेक्षा जास्त पत्रे फुटून घराचेही नुकसान झाले होते. यामुळे होत असलेल्या विजेच्या गडगडाटामुळे नागरिक भयभीत
झाले होते.
पिरंगुट, सुतारवाडी येथे पुणे-कोलाड महामार्गावर पाणी आल्याने वाहनचालकांना आपली वहाने चालविणे कठीण झाले होते. पौड येथे गटार व्यवस्था नसल्याने पाणी रस्त्यावरून वाहत होते, यामुळे मुळशी तालुका पंचायत समितीचे प्रवेशव्दार जलमय झाले होते.