नानगाव, पुढारी वृत्तसेवा: गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. पालेभाज्या, फळभाज्यांचे त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या चार महिन्यांत पावसाने चांगलीच हजेरी लावली. ऑक्टोबर महिन्यातही पावसाने चांगलाच जोर धरला आहे. दररोज कोसळणार्या पावसाने शेतात पाणीच पाणी झाले आहे. पावसामुळे शेतात पाणी साठत आहे. त्यामुळे पिकांचे तसेच जमिनीचेही नुकसान होत आहे.
दौंड तालुक्यातील भीमा नदीपट्ट्यातील बागायती भागात मोठ्या प्रमाणावर ऊसशेती केली जाते. उसाच्या शेतीतून शेतकर्यांना उशिरा पैसे मिळतात. त्यामुळे शेतकरी ऊसपिकांबरोबरच भाजीपाला व फळभाज्या देखील घेत असतात. याच पिकांवर शेतकरी आपले आर्थिक गणित आखत असतो. परंतु, गेल्या पंधरा दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे भाजीपाला पीक भुईसपाट झाले आहे.
दररोजच्या पावसामुळे शेतजमिनीत व शेतपिकांंमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठले आहे. त्यामुळे पिके सडू लागली आहेत. शेतजमिनींनाही पावसाचा फटका बसला आहे. काही ठिकाणी शेतकर्यांनी शेतात बियांची पेरणी केली होती. मात्र, दररोजच्या पावसाने शेतात पाणी साठत असल्याने पेरणी केलेले बियाणे देखील वाया गेले आहे. एकंदरीत, या पावसाने शेतकर्यांचे मोठे नुकसान केले आहे.