पुणे : आजवर कधीही मान्सून पुणे शहरात अन जिल्ह्यात मे महिन्यात आला नाही. मात्र यंदा तो 26 मे रोजी पुण्यात दाखल होत त्याने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गत अकरा दिवसांत शहरात सरासरी १९२, पाषाण २१६ तर लोहगावात २३८ मी.मी पावसाची नोंद झाली आहे .
गत दहा ते अकरा दिवसांपासून शहरात मान्सूनपूर्व पावसाचा धडाका सुरुच आहे. त्यामुळे गत ६४ वर्षातील पावसाचे सर्व विक्रम या पावसाने मोडले आहेत . शहरात ४६० टक्यांपेक्षा पाऊस झाला आहे. मान्सूनपूर्व पाऊस सुरु असताना सोमवारी (दि.२६) पहाटे ६ च्या सुमारास मान्सूनचे आगमन झाले आणि मान्सूनपूर्व आणि मान्सून या दोन्ही पावसाचे मिलन झाले. त्यामुळे पावसाचा जोर अधिकच वाढला. दुपारी १२ पासून पाऊस सुरु झालेला पाऊस सायंकाळी ५ वाजता थांबला. त्यानंतर पुन्हा रात्री ७ नंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली. शहरातील सर्व पेठा, उपनगरांत चिखलाचे साम्राज्य तयार झाले. त्यामुळे हवेत गारवा सुटला. गरम पदार्थावर ताव मारत पुणेकरांनी पावसाचे स्वागत केले.तर ठिकठिकणी तळी साचल्याने नागरिकांची ताराबंळ उडाली. दिवसभर शहरात पाऊस अन गारवा असेच वातावरण होते.