पुणे

आगामी पाच दिवस उष्णतेची लाट तीव्र ; भुसावळ 43.09 अंश, तर पुण्याचा पारा 39.2 अंशांवर

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मंगळवारी विदर्भातील 10 पैकी पाच जिल्ह्यांचे कमाल तापमान 43 अंशांवर गेले. दरम्यान, येत्या पाच दिवसांत उष्णतेची लाट अधिक तीव्र होत पारा 44 अंशांवर जाईल, असा इशारा हवामान विभागाने दिला. भुसावळचा पारा 43.09 अंश, तर चंद्रपूरचा पारा 43.6 अंशांवर गेल्याची नोंद झाली. पुण्याचे तापमान 39.2 अंश नोंदले गेले.बुलढाणा वगळता चंद्रपूरसह गोंदिया, वर्धा व गडचिरोलीच्या तापमानात पुन्हा अनुक्रमे 43.3, 43.2 43.0 तर 40.6 अंशाने नोंद घेण्यात आली आहे. तसेच अमरावती 43.1 तर ब्रह्मपुरीत 43.2 तापमानाची नोंद आज घेण्यात आली.

देशात उष्ण शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या चंद्रपूर, ब्रह्मपुरीमध्ये तापमानात सतत वाढ होत आहे. आठवडाभरापासून दोन्ही ठिकाणी तापमान 43 अंशांचे वर आहे. मंगळवारी चंद्रपूर राज्यात सर्वात हॉट ठरले. चंद्रपूर 43.6 तर ब्रह्मपुरी 43.2 अंश सेल्सिअस नोंद घेण्यात आली. विशेष म्हणजे गडचिरोली हा जंगलाचा जिल्हा असूनही तापमान 40 अंशा पार गेले आहे. मध्य भारतातील तापमान येत्या पाच दिवसांत 44 अंशांकडे जाईल, त्याचा परिणाम महाराष्ट्रभर जाणवत राहणार आहे. उर्वरित राज्यातील पारा चंद्रपूरच्या तुलनेत तूर्त कमी असला तरी जळगाव, कोल्हापूर, पुणे, नगर, परभणी, बीडचा पारा 39 ते 40 अंशांवर गेल्याने मध्य व उत्तर महाराष्ट्रातही ही लाट लवकरच सक्रिय होईल, असा अंदाज आहे.

पाकिस्तानात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने काश्मीरमध्ये पावसाला सुरुवात झाली. मध्य महाराष्ट्र ते कर्नाटक वारा खंडितता ही प्रक्रिया सुरू झाल्याने उत्तरेकडून थंड, तर दक्षिणेकडून दमट वारे येऊन त्यांची महाराष्ट्रात भेट होत आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेसह सायंकाळी पाऊस, असे वातावरण 24 एप्रिलपर्यंत राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT