पुणे

पुणे : उंच उंच इमारतींमुळे कोरेगाव पार्कवर उष्णतेची बेटं

अमृता चौगुले

आशिष देशमुख : 

पुणे : उंच इमारतींमुळे कोरेगाव पार्क भागावर कायमच उष्णतेची बेटे तयार होतात. इथे उंच इमारतींची जास्त गर्दी झाल्याने वारा वेगाने वाहण्यास अडचण निर्माण होऊन उष्णता बाहेर जात नाही, त्यामुळे या भागाचे तापमान वातावरणातील तापमानापेक्षा सरासरी 2 ते 5 अंंशांनी कायम जास्त असते, असे मत हवामान व नगररचना तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

मंगळवारी दि.21 फेब्रुवारी रोजी कोरेगाव पार्क भागाचे तापमान संपूर्ण देशात सर्वाधिक 40 अंशांवर गेले होते. ते वृत्त 'पुढारी'ने सर्वप्रथम दिले. कोरेगाव पार्क हा भागच का जास्त तापतो आहे, याचा अभ्यास केला असता तज्ज्ञांनी या भागाचे अतिशहरीकरण झाल्याने हा प्रकार होत असल्याचे मत व्यक्त केले. कोरेगाव पार्क हा भाग श्रीमंतांचा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येथे उंचच उंच इमारती झाल्या. इमारतींवर डेकोरेटिव काचा आहेत. त्यामुळे उष्णता परावर्तीत होते पण ती त्याच भागात राहते. कारण तेथे पुरेशी खेळती हवा नाही. याच भागात दररोज वाहतुकीची मोठी कोंडी होत असल्याने त्याचाही परिणाम तापमान वाढीवर होत असल्याचे पुणे वेधशाळेचे प्रमुख डॉ.कृष्णांनंद होसाळीकर व मुंबई येथील नगररचना विषयाच्या ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय अभ्यासक सुलक्षणा महाजन यांनी व्यक्त केले.

वारा वाहण्यास मोकळी जागा नाही
महाजन यांनी सांगितले की, कोरेगाव पार्कमध्ये उंच इमारती जास्त आहेत. या भागाचे अतिशहरीकरण झाल्याने सिमेंटचे रस्ते, पूलही झाले. दाट लोकसंख्या वाढल्याने मोकळी जागा आता नाही, त्यामुळे उंच इमारतीवर उष्णतेची बेट (हिट आयलॅन्ड) तयार होत आहेत. सिमेंटच्या

इमारती दिवसा उन्ह शोषून घेतात. पण येथे वारा वाहण्यास मोकळी जागा नसल्याने सायंकाळी इमारतीतून निघणारी उष्ण हवा या भागातून बाहेरच पडत नाही. त्यामुळे तेथे उष्णतेची बेटे तयार होतात. तेथील तापमान वातावरणापेक्षा कायम 2 ते 5 अंशांनी जास्त असते.

हरित इमारती हाच उपाय..
महाजन यांनी यावर उपाय सुचवला आहे. त्या म्हणाल्या, आता वेगाने वाढणारे नागरीकरण आपण थांबवू शकत नाही. त्यासाठी सिंगापूरने वापरलेला हरित इमारती हाच पर्याय योग्य आहे. उंच इमारती पूर्व, पश्चिम व दक्षिण या तीन बाजूंनी तापतात त्यासाठी इमारतीवर खालपासून वरपर्यंत हिरव्या वेली लावल्या जातात. त्यामुळे दिवसभर या इमारती तापत नाहीत. वेलींमुळे इमारती थंड राहतात. उष्णतेची बेट तयार होत नाहीत.

इमारतीत काचा किती लावायच्या, इमारतीची लांबी, रुंदी व उंची यांचा अंदाज घेऊन संगणकावर त्याचे मोजमाप करून तेथील उष्णता मोजता येते. त्याला 'सिम्युलेशन' म्हणतात. तो प्रकार आता कोरेगाव पार्कमध्ये नवे बांधकाम करताना करावा लागेल. असा प्रयोग सिंगापूर व सॅनफ्रांन्सिस्को येथे गेल्या आठ ते दहा वर्षांपासून सुरू होऊन यशस्वी झाला आहे.
                              -सुलक्षणा महाजन, ज्येष्ठ नगररचना अभ्यासक, मुंबई.

गेल्या काही वर्षांपासून कोरेगाव पार्कचे तापमान हे शहरातील इतर भागांपेक्षा सतत जास्त आहे. याचे कारण या भागाचे झालेले अतिशहरीकरण हेच आहे. उंच इमारती, सिमेंटचे रस्ते, कमी झालेली हिरवळ व झाडी. कमी खेळती हवा. मोकळ्या जागांची कमतरता. दाट लोकसंख्या या सर्व कारणांंमुळे कोरेगाव पार्कसह वडगावशेरी, चिंचवड हे भागदेखील खूप तापत आहेत.
                                 – डॉ. कृष्णानंद होसाळीकर, हवामान तज्ज्ञ, पुणे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT