पिरंगुट (ता. मुळशी); पुढारी वृत्तसेवा : पिरंगुट येथील मुकाईवाडीकडे जाणार्या रस्त्यावर कचर्याचे ढीग साचले आहेत. गाडीतून जाता जाता घरातील कचरा रस्त्याच्या कडेला फेकणे आणि पुढे जाणे ही अत्यंत वाईट सवय सध्या या रस्त्याने जाणार्या नागरिकांना लागलेली असून, ही मोडीत काढण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
पिरंगुट ग्रामपंचायत तसेच अनंतराव पवार महाविद्यालयाच्या वतीने अनेक वेळा या रस्त्याची स्वच्छता करण्यात आली होती. परंतु काही नागरिक अजूनही या रस्त्यावरून ये-जा करताना कचरा टाकत आहेत. भुगाव ग्रामपंचायतीने यावर अतिशय प्रभावी तोडगा काढून जे महाभाग कचर्यावर रस्ता टाकत होते, त्यांच्यावर कारवाई केली.
फक्त कारवाई करून थांबले नाही तर त्यांनी त्यांचे फोटो, व्हिडीओ ते ज्या सोसायटीत राहतात, ज्या फ्लॅटमध्ये राहतात त्या फ्लॅटच्या नंबरसहित सोशल मीडियावर फिरविले. त्यामुळे भूगाव परिसरामध्ये कचरा टाकण्याचे नागरिकांनी बंद केले. पिरंगुटकरांनीही तोच पॅटर्न राबवावा, अशी मागणी होत आहे.
कचरा टाकणारे हे स्थानिक मुळशीकर नसून फिरायला येणारे पर्यटकच आहेत, असे आमच्या अनेक वेळा निदर्शनास आले. त्यांच्यावर ठोस आणि योग्य कार्यवाही करण्यात येईल.
– महादेव कोंढरे, मुळशी तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस