पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या गाडीखाना येथील आरोग्य विभागाच्या भांडार विभागामध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने शहरी गरीब योजना आणि अंशदायी आरोग्य योजनांच्या लाभार्थ्यांची गैरसोय होत आहे. अंदाजपत्रकातील तरतूद संपल्यामुळे रुग्णांवर बाहेरून औषधे आणण्याची वेळ आली आहे. महापालिका शहरी गरीब योजना आणि अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना मोफत औषधे दिली जातात. त्यासाठी आरोग्य विभागाला वर्षाला 40 कोटी रुपये खर्च येतो;
पण यंदा आरोग्य विभागाला यासाठी 30 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे यासाठी आरोग्य विभागाला निधी कमी पडला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने या योजनेसाठी 10 कोटी रुपये वर्गीकरणाद्वारे मागितले आहेत. हा प्रस्ताव वित्तीय समिती आणि स्थायी समितीकडे मान्यतेसाठी जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान 15 दिवस लागणार आहेत.
गेल्या पंधरा दिवसापासून रुग्णांना औषधे मिळत नाहीत. त्यात कॅन्सर आणि किडनी विकाराच्या रुग्णांची औषधे अत्यंत महाग असतात. त्यामुळे या रुग्णांचे सर्वाधिक हाल होत असून, ही औषधे मिळण्यासाठी आणखी पंधरा दिवस वाट पाहावी लागणार आहे.दोन स्टोअरेज (साठा) सेंटर हवी महापालिकेच्या औषधाचा सर्व स्टॉक गाडीखाना येथील स्टोअरोज सेंटरमध्ये आहे; पण शहराचा भौगोलिक विस्तार वाढला आहे. त्यामुळे औषधाचे स्टोअरेज करणारी दोन सेंटर हवीत अशी मागणी नागरिक करत आहेत.