पुणे

Pune News : तोरणा खोर्‍यातील आरोग्य सेवा ठप्प

अमृता चौगुले

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  प्रशासनाच्या उदासीनतेमुळे वेल्हे तालुक्यातील तोरणा खोर्‍यातील आरोग्य सेवा ठप्प झाली आहे. गडाच्या पायथ्याला असलेल्या पासली येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाईच डॉक्टर म्हणून रुग्णांवर उपचार करीत आहे. या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. रुग्णांना वार्‍यावर सोडणार्‍या कामचुकार डॉक्टर, कर्मचार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. पासली आरोग्य केंद्रात एकच डॉक्टर आहेत. ते रविवारी (दि. 3) त्यांच्या गावी गेले. त्यामुळे आरोग्य केंद्रात डॉक्टर नाही. नियुक्तीस असलेल्या परिचिरिका, कर्मचारीही गायब झाले आहेत. सोमवारी (दि. 4) सकाळपासून आरोग्य केंद्रात एक शिपाई होता.

संबंधित बातम्या :

रायगड जिल्ह्यालगतच्या केळद, कुंबळे, कुसार पेठ, भोर्डी आदी भागांतून पायपीट करून आलेले महिला, मुले, वृद्ध रुग्ण आरोग्य केंद्रात उपचारासाठी ताटकळत बसून होते. जवळपास वीस ते पंचवीस रुग्ण आवारात डॉक्टरांची प्रतीक्षा करीत होते. कुंबळे (ता. भोर) चे माजी सरपंच विजय बलकवडे, कार्यकर्ते मोहन खुळे यांनी या गंभीर प्रकाराची माहिती वेल्हे पंचायत समितीच्या आरोग्य विभागाला दिली. त्यानंतर वेल्हे येथून एक परिचारिका सकाळी अकरा वाजता आरोग्य केंद्रात दाखल झाल्या. याबाबत वेल्हे तालुका पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. जयदीपकुमार कापशीकर म्हणाले, की पासली आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी रविवारी गावी निघून गेल्या. त्यामुळे आरोग्य केंद्रात डॉक्टर नव्हते. त्यामुळे आंबवणे आरोग्य पथकाच्या डॉक्टरांना पासली केंद्रात पाठविण्यात आले. आरोग्य केंद्रात दुसरा वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. ते लवकरच रुजू होतील. आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी डॉक्टर, कर्मचारी नियुक्त करण्यात यावेत, अशी मागणी केळदचे माजी सरपंच रमेश शिंदे व ग्रामस्थांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT