पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या जागी विजयकुमार खोराटे यांची प्रतिनियुक्तीवर नियुक्ती करण्यात आली. मात्र, दोन आठवडे उलटूनही या नियुक्तीचा तिढा कायम आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांकडे असलेल्या 14 विभागांचे कामकाज ठप्प झाले आहे. पर्यायाने विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग रोष व्यक्त करीत आहेत.
अतिरिक्त आयुक्त पदावरून प्रदीप जांभळे व स्मिता झगडे यांचा वाद मॅटमध्ये सुरू आहे. त्यानंतर याच पदावर नवा वाद सुरू झाला आहे. विजयकुमार खोराटे यांची राज्य शासनाने प्रतिनियुक्तीवर नियुक्ती 6 जुलैला केली. नियमानुसार खोराटे हे 7 जुलैला पालिकेत रूजू झाले. तेव्हापासून ते दालनात हजेरी लावत आहेत. मात्र, अतिरिक्त आयुक्त (दोन) या पदाचे कोणतेही कामकाज त्यांच्यामार्फत सुरू झालेले नाही.
दरम्यान, राज्य शासनाकडून कोणताही नवीन आदेश पालिकेला प्राप्त झालेला नाही. या परिस्थितीत अतिरिक्त आयुक्त पदाचे संपूर्ण कामकाज ठप्प आहे. त्यांच्याकडे प्रशासन, माहिती व तंत्रज्ञान, पशु वैद्यकीय, क्रीडा, स्थापत्य प्रकल्प, वैद्यकीय, आरोग्य, आकाशचिन्ह व परवाना, निवडणूक, भूमी आणि जिंदगी, पर्यावरण, कायदा आणि बीआरटीएस प्रकल्प असे एकूण 14 विभाग आहेत.
अतिरिक्त आयुक्तांकडील संपूर्ण कामकाज बंद असल्यामुळे तसेच, फाईलीवर सह्या होत नसल्याने या विभागाचे अधिकारी व कर्मचाही वैतागले आहेत. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांचे कामकाज कधी सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, राजकीय दबावामुळे आयुक्त शेखर सिंह यांनी खोराटे यांना रूजू करून घेतले नसल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची अचानक मुदतपूर्व बदली झाली. मात्र, दोन आठवडे झाले तरी, अद्याप विजयकुमार खोराटे यांना कामकाज सुरू करता आलेले नाही. तसेच, राज्य शासनाकडून नवीन आदेश आलेले नाही. सध्या विजयकुमार खोराटे हेदेखील महापालिकेत फिरत नसल्याचे दिसून येत आहे. अतिरिक्त आयुक्त पदाचे कामकाज ठप्प असल्यामुळे महापालिकेत काय चालले आहे, असा प्रश्न दबक्या आवाजात विचारला जात आहे.
हेही वाचा