निरा: गोव्यावरून हजरत निजामुद्दीनकडे (दिल्ली) निघालेल्या गाडीच्या वातानुकूलित डब्याच्या चाकातून धूर येताना दिसल्याने निरा स्टेशनमधील कर्मचार्यांनी गार्डला रेड सिग्नल दाखवत गाडी रोखली. पाच तासांहून अधिक वेळ मिरज - पुणे रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक त्यामुळे खोळंबली होती. दरम्यान, इतर प्रवाशी गाड्यांचेही वेळापत्रक यामुळे कोलमडले. त्याचा प्रवाशांना त्रास झाला.
गोवा येथून हजरत निजामुद्दीनकडे निघालेली एक्स्प्रेस निरा स्टेशनमधून तीन नंबरच्या रेल्वे लाइनने रविवारी (दि. 2) पहाटे पाचच्या सुमारास पुणेच्या दिशेने जात असताना वातानुकूलित एम 2 डब्याच्या एका चाकात आग दिसल्याने निरा स्टेशनमधील कर्मचार्यांनी तत्काळ त्या गाडीच्या गार्डला रेड सिग्नल दिला. त्यामुळे एक्स्प्रेस गाडी पुढे पिंपरे खुर्द गावाच्या हद्दीत थांबली. सकाळी आठपर्यंत जवळपास तीन तास गाडी उभी होती.
रेल्वे प्रशासनाने कोणत्याच हालचाली न केल्याने प्रवाशांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. सकाळी आठनंतर हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस निरा स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर एकवर आली. या गाडीचा एम 2 डबा निरा रेल्वे स्थानकातील रेल्वेलाइन नंबर दोनवर सोडण्यात आला. त्यानंतर नऊच्या दरम्यान हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस पुणेच्या दिशेने गेली. तोपर्यंत एक्स्प्रेसमधील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
प्रवाशांचा खोळंबा निरा रेल्वे स्थानकात रविवारी पहाटे थांबलेल्या हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसमुळे तिच्यामागे येणार्या सह्याद्री एक्स्प्रेस, दर्शन एक्स्प्रेस, सकाळी पावणेआठची सातारा - पुणे डेमो या प्रवासी गाड्या विविध स्थानकांवरच अडकून पडल्या. हजारो प्रवाशांचा यामुळे खोळंबा झाला.