पुणे

हवेली पोलिस ठाण्याने जप्त केलेली वाहने पदपथावर; सिंहगड रस्त्यावर वाहतुकीस अडथळा

अमृता चौगुले

धायरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : हवेली पोलिस ठाण्याने विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली वाहने अभिरुची मॉलजवळ सिंहगड रस्त्यावर व पदपथावर उभी केली आहेत. या वाहनांमध्ये झाडे, झुडपेही वाढली असून कचर्‍याही साचला आहे. अभिरुचीच्या प्रवेशद्वारापासून येथील महालक्ष्मी मंदिरापर्यंत ही वाहने उभी केल्याने वाहतुकीस अडथळा होत असल्याने वाहनचालक, पादचारी त्रस्त झाले आहेत.

सिंहगड रस्ता व पदपथावर पोलिसांनी जप्त केलेल्या दोनशे दुचाकी, दोन डंपर, दहा कार, एक टेम्पो व एक रिक्षा आदी वाहने गेल्या काही महिन्यांपासून उभी करण्यात आली आहेत. या ठिकाणी असलेल्या महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी दररोज शेकडो भाविक येतात. या परिसरात सिंहगड रोड पोलिस ठाण्याची अभिरुची पोलिस चौकीही आहे. तसेच अभिरुची मॉलही असल्याने या ठिकाणी नागरिकांची नेहमी वर्दळ असते.

मात्र, रस्त्यावर व पदपथावर उभ्या केलेल्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा होत असून, वाहनचालक व नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच वाहनांमध्ये कचरा साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पोलिसानी या ठिकाणी उभी केलेली वाहन तातडीने हाटविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. सिंहगड रस्त्यावर उभी केलेली ही वाहने तातडीने हटविण्याबाबत पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे. ही वाहने न हटविल्यास हवेली पोलिस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे शिवसेना युवा शहर, जिल्हाप्रमुख नीलेश गिरमे यांनी सांगितले.

पोलिस निरीक्षकांनी उत्तर देणे टाळले!

सिंहगड रस्त्यावर व पदपथावर उभ्या करण्यात आलेल्या वाहनांबाबत हवेली पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना विचारले असता, त्यांनी याबाबत उत्तर देण्यास टाळले. दरम्यान, या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याने वाहनचालक व पादचार्‍यांची मोठी गैरसोय होत आहे. मात्र, पोलिसांकडून दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

SCROLL FOR NEXT