लोणी काळभोर : सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे हवेली तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. हजारो नागरिकांची घरे पाण्यात गेल्याने अखेर महसूल विभागाने बेकायदा ‘प्लॉटिंग’ करणार्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा व अनधिकृत ‘प्लॉटिंग’ केल्याचे फौजदारी गुन्हे प्लॉटिंग व्यावसायिक व जमीनमालक यांच्यावर दाखल करण्याचे आदेश हवेलीचे उपविभागीय महसूल अधिकारी यशवंत माने यांनी तहसील कार्यालयांना दिले आहेत. (Latest Pune News)
हवेली तालुक्यात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनतेची दैना झाली. घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. जीवनावश्यक साहित्य तसेच घरांचे, शेतीचे नुकसान झाले. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी महसूल यंत्रणेला मोठे प्रयत्न करावे लागले. या घटनेनंतर हवेलीच्या महसूल विभागाने तालुक्यात फोफावलेल्या अनधिकृत बेकायदा ‘प्लॉटिंग’विरुद्ध कडक पावले उचलली आहेत. तालुक्यात नैसर्गिक प्रवाह अडवून केलेले खोदकाम, टेकडी फोड, बेकायदा ‘प्लॉटिंग’, शासकीय परवानगी न घेता विक्री केलेले प्लॉट, जाहिरातीचे फलक, रस्ते अडविणे, तुकडेबंदीचे नियम पायदळी तुडवल्याने हवेलीचे उपविभागीय महसूल अधिकारी यशवंत माने यांनी हवेली, लोणी काळभोर, पिंपरी- चिंचवड तहसील कार्यालयातील तहसीलदारांना वेगवेगळ्या चार कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
प्लॉटिंग’ विकसक, जमीनमालक यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा, नैसर्गिक प्रवाह अडविल्याबद्दल तसेच अनधिकृत ‘प्लॉटिंग’, नियमबाह्य घरे बांधकाम करणे आणि नागरिकांचे झालेले नुकसान या कालमांतर्गत गुन्हे सरसकट दाखल करावे, असे आदेश देण्यात आले आहेत. बेकायदा ‘प्लॉटिंग’ व्यवसाय करणार्यांचे यामुळे पुरते धाबे दणाणले आहे. आता तालुक्यातील तहसीलदार किती प्रामाणिकपणे गुन्हे दाखल करतील की फक्त तोंडदेखली कारवाई करतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
बेकायदा ‘प्लॉटिंग’ व्यावसायिकांनी अनेक नियम पायदळी तुडविले आहेत. तहसीलदारांनी आता या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची अपेक्षा आहे. या व्यावसायिकांनी अनेक शासकीय जमिनीवरसुद्धा डल्ला मारला आहे. प्लॉटशेजारील ओढे, नदी, गायरान जमिनी असतील तर ते गिळंकृत करून फुकटच्या जमिनीवर करोडो रुपये कमविले आहेत, त्यांच्यावरही गुन्हे दखल होणार का? अशी चर्चा नागरिकांत सुरू आहे.