जिल्हा परिषद, मनपा निवडणुकीतील आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर होणार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती File Photo
पुणे

Political News: जिल्हा परिषद, मनपा निवडणुकीतील आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर होणार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती

आरएसएस व भाजपवर केली सडकून टीका

पुढारी वृत्तसेवा

पुणे: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्रित राजकीय आघाडी झाल्यामुळे स्थानिक राजकीय स्थितीमुळे अनेक अडचणी निर्माण होतात. याचा कोणाला कधी फायदा होतो तर कोणाला तोटा.

कॉंग्रेसला याचा मोठा फटका बसला असून अनेक भागातून पंजा हद्दपार झाला. त्यामुळेच आम्ही या निवडणुकीत राज्यस्तरावर महाविकास आघाडी करून लढायचे नाही असे ठरवले असून या बाबतचा निर्णय पक्षांच्या स्थानिक शाखा घेतील, अशी स्पष्टोक्ती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. (Latest Pune News)

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात हर्षवर्धन सपकाळ बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली. तसेच राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या मुद्द्याला उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोगाऐवजी भाजपचे नेते का पुढे येतात? असा थेट सवाल त्यांनी केला. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रीजमोहन पाटील व सरचिटणीस मंगेश फल्ले उपस्थित होते.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य पातळीवर कुठलीही आघाडी केली जाणार नाही, आघाडीचे अधिकार हे स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत. पक्षाची पुन्हा बांधणी करण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय प्रदेश काँग्रेस कमिटीचा निरीक्षक नेमले जाणार आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी शहर, तालुका, जिल्हा पातळीवर चर्चा करून एकमत झाले, तर स्थानिक स्तरावर आघाडी करता येईल, असे धोरण पक्षाने ठरवले आहे.

आरएसएसवर टीका करताना सपकाळ म्हणाले, आरएसएस नेहमी स्वतःला सांस्कृतिक संघटना म्हणून मांडते, तर दुसरीकडे राजकीय पक्ष काढून सत्तेतही सहभागी होते. स्थापणेपासूनच आरएसएसची विचारधारा ही मनुवादी राहिलेली आहे. त्यामुळेच या विचारधारेविरोधात गौतम बुद्ध, भगवान महावीर, संत चोखामेळा, संत तुकाराम आदी संतांनी विद्रोह केला. सावित्रीबाई फुले यांच्यावर पुण्यात शेणगोळ्यांचा मारा करणारेही पारशी, मुस्लिम वा ख्रिश्चन नव्हते; तर ते मनुवादीच होते. या विचारधारेला कॉंग्रेसने नेहमी विरोध केला आहे.

काँग्रेसला 'केडर बेस' पक्ष करण्यावर भर

काँग्रेस पक्ष खिळखिळा झाल्याची टीका होत आहे असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता सपकाळ म्हणाले, काँग्रेस हा पूर्वीपासूनच 'मास बेस' पक्ष होता. त्यामुळेच सत्ता असताना अनेक जण काँग्रेसकडे आले आणि सत्ता गेल्यावर त्यांनी पक्ष सोडला. ज्यांनी पक्ष सोडला त्यांची आज काय स्थिती आहे ते सर्वांना माहिती आहे. कॉंग्रेसची पुन्हा उभारणी करण्यासाठी आता आम्ही काँग्रेसला 'केडर बेस' पक्ष करण्याचा प्रयत्न करत आहोत,” असे सपकाळ म्हणाले.

रामराज्याची भाषा करणाऱ्यांनी आता अग्निपरीक्षेलाही सामोरे जावे

मतचोरीबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर सपकाळ म्हणाले, राहुल गांधी हे फक्त आरोप करत नाहीत, तर निवडणूक आयोगानेच दिलेली आकडेवारी आणि मतदान प्रक्रियेदरम्यान आयोगाने दाखल केलेल्या गुन्ह्यांचे पुरावे देतात. “मात्र आयोग गप्प आहे, उलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेतेच उत्तर देत आहेत. फडणवीस हे आयोगाचे वकील आहेत की दलाल? असा आमचा प्रश्न आहे. रामराज्याची भाषा करणाऱ्यांनी आता अग्निपरीक्षेलाही सामोरे जावेत,” असे त्यांनी म्हटले.

आरक्षण हा जातीय मुद्दा नसून सामाजिक

आरक्षणावर सपकाळ म्हणाले, “आरक्षण हा जातीय मुद्दा नाही. हा मुद्दा सामाजिक आहे. त्या दृष्टिकोनातून त्याला पहावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस त्याला राजकीय हेतूने पाहतात, ज्यामुळे सामाजिक ऐक्य बिघडते. त्यामुळेच काँग्रेसने जातनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. तेलंगणा, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमध्ये अशी गणना झाली व त्यांनी तसे आरक्षण दिले गेले. अशीच गणना महाराष्ट्रात देखील व्हावी, अशी आमची मागणी आहे,” असे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT