पुणे

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार

Laxman Dhenge

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : भाजपचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या इंदापूर तालुक्याच्या पदाधिकार्‍यांनी त्यांचा सत्कार केल्याने तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. पाटील यांची कन्या भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील-ठाकरे व भाजप कोअर कमिटीचे तालुकाप्रमुख राजवर्धन पाटील यांनी विधानसभेला आम्हाला जो मदत करेल, त्यांनाच आम्ही लोकसभेला मदत करू, अशी भूमिका जाहीर केल्याने आणि त्यानंतर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून झालेला सत्कार, यामुळे तालुक्यातील राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राष्ट्रीय साखर महासंघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील यांची निवड खरेतर हा शरद पवार यांना धक्का मानला जात असताना प्रथम त्यांच्याच पदाधिकार्‍यांनी सत्कारासाठी पुढाकार घेतल्याने राजकीय गणिते मांडली जात आहेत. शरद पवार गटाकडून हर्षवर्धन पाटील यांना लोकसभेच्या अनुषंगाने मदतीसाठी पायघड्या घातल्या जात आहेत की काय? अशी चर्चा देखील रंगू लागली आहे.
या वेळी शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते अशोक घोगरे, कालिदास देवकर, किसनराव जावळे, छगन तांबिले, अमोल भिसे, तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष समद सय्यद, आप्पासाहेब वाघमोडे यांच्यासह महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पाटील यांचा सत्कार केला.

पाटील माझे मोठे भाऊ : खा. सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे इंदापूर दौर्‍यावर येताच प्रत्येक भाषणात हर्षवर्धन पाटील हे माझे मोठे भाऊ आहेत, असे वारंवार बोलून दाखवत आहेत. यामुळे नवीन समीकरणे जुळतात की काय? याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT