ओतूर : रविवारची (दि. १९) सुट्टी असल्याने हरिश्चंद्रगडावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली असताना दुपारच्या सुमारास आडव्या कड्याजवळ अचानक दरड कोसळून माती व दगडांचा मारा झाल्याने चार पर्यटक गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये दोन पर्यटक माती व दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते; मात्र, पर्यटकांच्या संरक्षणासाठी उभारण्यात आलेल्या रेलिंगमुळे मोठी जीवितहानी टळली.
मालाड (मुंबई) येथील १० जणांचा पर्यटकांचा गट हरिश्चंद्रगड पाहून खाली उतरत होता. त्यावेळी आडव्या कड्याच्या मागील बाजूस अचानक दरड कोसळली आणि माती व मोठमोठे दगड पर्यटकांच्या अंगावर येऊन पडले. या दुर्घटनेत चार जण गंभीर जखमी झाले, तर दोन जण थेट माती व दगडांच्या ढिगाऱ्याखाली अडकले.
घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. पर्यटकांसोबत असलेल्या इतर सदस्यांनी तसेच स्थानिक ग्रामस्थ अमोल बादड यांनी प्रसंगावधान राखत तातडीने गावकऱ्यांना आणि वन विभागाला माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत इतर पर्यटकांच्या मदतीने माती व दगडाखाली अडकलेल्या जखमींना सुखरूप बाहेर काढले.
जखमींना खांद्यावरून उचलून गडाच्या पायथ्यापर्यंत आणण्यात आले. त्यानंतर खासगी वाहनातून त्यांना राजूरकडे रवाना करण्यात आले. वाटेत १०८ रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यानंतर जखमींना राजूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. अभिनव लहामटे यांनी प्राथमिक उपचार करून गंभीर स्थिती लक्षात घेता चौघांनाही पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार चारही जखमींना नाशिक येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.
या दुर्घटनेतील जखमींची नावे रामप्रकाश यादव, निलेश गोमाती विश्वकर्मा, कृष्णाकुमार साहू आणि दिनेश संजय साहू अशी असून, त्यापैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच राजूर (ता.अकोले) पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक किशोर पवार, वनक्षेत्रपाल दत्तात्रय पडवळ तसेच लांडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्यात सहभाग घेत जखमींना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली व नंतर त्यांना नाशिक येथे पुढील उपचारासाठी हलविण्याची व्यवस्था केली.
सतत सुरू असलेल्या पावसामुळे हरिश्चंद्रगड व माळशेज घाट परिसरातील डोंगरकडे आणि दरडी धोकादायक बनल्या असून, पावसाळ्यात गडभ्रमंती करणाऱ्या पर्यटकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.