पुणे

आनंद वार्ता! मान्सूनची तळकोकणात हजेरी; आजपासून राज्यातही पाऊस

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अनुकूल स्थितीमुळे मान्सून तळकोकणच्या सीमेजवळ आला असून तो आगामी 24 ते 48 तासांत कधीही राज्यात येऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने सोमवारी दिला. पुणे शहरासह राज्यातील इतर भागातही तो 5 ते 6 जूनदरम्यान येण्याची शक्यता आहे. राज्यातील हवेचा दाब मान्सून सक्रिय होण्यास अनुकूल झाल्याने सोमवारी अरबी समुद्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, बंगालचा उपसागर या भागात त्याने प्रगती केली.

तो लवकरच मध्य अरबी समुद्रासह दक्षिण महाराष्ट्रात आगामी 24 ते 48 तासांत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण, गोवा, विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात जोरदार वार्‍यासह पावसाचा अंदाज आहे, तर ठाणे, पालघर भागात उष्मा जाणवेल.

ईशान्य भारतात प्रगती

बंगालच्या उपसागरापासून ते पूर्वोत्तर भारतात मान्सूनची स्थिती सध्या किंचित मंदावलेली दिसत असली तरीही त्या भागात जोरदार पाऊस सुरू आहे. अरुणाचल प्रदेशात गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा ताशी 30- 40 किमी वेगाने वाहत आहे. आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आजपासून राज्यात पाऊस वाढणार

मान्सून तळकोकणाच्या अगदी सीमेजवळ आल्याने राज्यात बाष्पयुक्त वार्‍यांचा प्रभाव वाढल्याने सोमवारी (दि. 3 जून) बहुतांश भागात ढगाळ वातावरण दिसून आले. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला 4 ते 7 पर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT